निगडी प्राधिकरणात २२० दुर्मिळ देशी झाडांची लागवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/tree-planataion.jpg)
देवराई फाऊंडेशन, स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाचा उपक्रम
पिंपरी |महाईन्यूज|
देवराई फाऊंडेशन, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राजेंद्र बाबर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते बिजलीनगर उड्डाणपूल या भागात २२० देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे.
निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात असंख्य झाडे आहेत. परंतु, दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेमुळे, तसेच पावसाळ्यात पडझडीमुळे झाडांचे नुकसान होते. या भागातील हिरवाई टिकून राहावी. तसेच, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. या हेतूने सामाजिक संस्थांनी संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते बिजलीनगर रेल्वे उड्डाणपूल पर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली. झाडे लावताना २२० दुर्मिळ देशी झाडांची लागवड केली आहे. महारूक, धेड उंबर, लक्ष्मी तरू, खजूर, मोठा शिरीष, रोहीतक, पिवळा कांचन, काटे सावर, अर्जून, पळस, बुच पांगारा, कौशी, मोह, रिठा यासह ३० देशी, दुर्मिळ जातींच्या झाडांचा त्यात समावेश आहे. तसेच, या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांच्यासह देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेंडबाळे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे, दीपक नलावडे, लाला माने, राजेश देशमुख, दत्तात्रय जोशी, दिपक ब्रम्हे, शैलेश भिडे, महाापालिकेचे उद्यान अधिक्षक डी. एन गायकवाड यांनी पुढाकार घेतला.