दडपशाहीने पवना जलवाहिनी प्रकल्प राबविल्यास आंदोलन छेडू – माजी मंत्री बाळा भेगडे यांचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Sanjay-696x398-1.jpg)
मावळ |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध कायम असून, सरकारने दडपशाहीच्या मार्गाने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.
राज्य सरकार व महापालिकेच्या वतीने जलवाहिनीचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. भेगडे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष ऍड. दिलीप ढमाले, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, गुलाबराव म्हाळसकर, अलका धानिवले, ज्योती शिंदे, संदीप काकडे, सुनील चव्हाण, संतोष कुंभार, नागेश ओव्हाळ, संतोष कदम आदी उपस्थित होते.
भेगडे म्हणाले, “स्थगिती असलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींच्या बातम्यांमुळे येथील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकल्पाविरोधात भारतीय किसान संघ, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्षांनी आंदोलन केले. आजही या पक्षांचा विरोध कायम आहे. आता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता दडपशाहीने या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.
वाघमारे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नसून, पद्धतीला आहे. जलवाहिनीची तेथील सर्वसामान्य नागरिकांची मागणी नसून, ती पंचतारांकितांची आहे. पाइपलाइनच्या आडून करोडो रुपये गिळण्यासाठी अधिकारी व ठेकेदार ही मागणी पुढे रेटत आहेत. प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.”
ऍड. ढमाले म्हणाले, “आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी खासदार राहुल गांधी आले होते व त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता व त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. आमचा पाण्याला विरोध नाही परंतु जलवाहिनीला मात्र कायम आहे. महापालिकेने वाढते नागरिकरण व लोकसंख्या लक्षात केवळ पवना धरणावर अवलंबून न राहता इतर पर्याय शोधणे गरजेचे होते. मात्र त्यांनी त्याबाबत काहीही हालचाल केली नाही.” तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती दत्तात्रेय शेवाळे यांनी आभार मानले.