तुकाराम मुंढें यांची १२ दिवसांत कोरोनावर मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/tukaram-mundhe.jpg)
नागपूर – धडाकेबाज सनदी अधिकारी अशी ओळख असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जवळपास १२ दिवसांच्या अलगीकरणानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तुकाराम मुंढे यांनी रविवारी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
‘माझा कोविड १९ अहवाल निगेटिव्ह आला आहे. सकारात्मक विचार आणि कृतीनेच कोविडशी लढा देण्याची गरज आहे. प्रबळ इच्छाशक्ती, नेमके उपचार व उपाययोजना, सामूहिक काळजी यातूनच कोविडच्या संकटावर मात करता येऊ शकते. चांगल्या भविष्यासाठी व आरोग्यासाठी सामूहिक सामाजिक कृतीची गरज आहे’, असे मुंढे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती २५ ऑगस्ट रोजी दिली होती. त्यासोबतच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मुंढे यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. मात्र नियमानुसार ते होम क्वारंटाईन झाले होते. ते क्वारंटाईन असतानाच राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर बदली केली. आता त्यांच्या बदलीवरून नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.