breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अमित शहांच्या भेटीनंतरही शिवसेनेचा स्वबळाचा नारा कायम

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेची मनधरणी केल्यानंतरही शिवसेनेचा स्वबळाचा निर्धार कायम आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून या निर्णयात बदल होणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत स्वबळाचा पुनरूच्चार केला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय याआधीच घेतला असून तसा ठराव पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आम्हाला अमित शहा यांच्या अजेंड्याची माहिती आहे. मात्र, यापुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मंजूर केल्याने आता या निर्णयात बदल नाही, असे राऊत यांनी रोखठोकपणे सांगितले. एका पक्षाचा ठराव दुसरा कोणताही पक्ष ठरवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

“संपर्क से समर्थन’ हे अभियान घेऊन मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी बुधवारी “मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा होऊन शिवसेना-भाजपच्या संबंधाला नवे वळण मिळाल्याचे सांगितले जात होते. शहा आणि ठाकरे यांच्यातील चर्चेचे मुद्दे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
दोघांमध्ये नेमक्‍या कोणत्या राजकीय मुद्यांवर चर्चा झाली? या चर्चेतून ठाकरे यांचे समाधान झाले काय? अमित शहा यांनी उध्दव यांना कोणती आश्वासने दिली? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. मात्र, दोघांमधील चर्चा बराच काळ लांबल्याने सेना-भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याचा कयास बांधला जात आहे.

शिवसेनेची किंमत किती ठरली : नवाब मलिक 
भाजप गेल्या साडेतीन वर्षांपासून किंमत देत नसल्याची ओरड शिवसेनेकडून केली जात होती. आता शहा-ठाकरे यांच्या दोन तासाच्या भेटीत शिवसेनेची किंमत ठरली काय? असा खोचक सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला. या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील कोटी जनतेला हवे आहे. त्यामुळे तशी माहिती शिवसेना-भाजपने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button