सर्दी-खोकल्यावर घ्या ‘हे’ घरगुती काढे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/cold-l-re-1.jpg)
पावसाच्या धारा, गार वारा, गरमागरम भजी आणि वाफाळता चहा…अहाहा! हे समीकरण भारीच आहे. मात्र या समीकरणाबरोबर येणारी सर्दी, खोकला, ताप आणि अपचनाचं काय? अहो त्याचीही चिंता करू नका, बिंदास्त पावसाचा आनंद घ्या. कारण आज आपण पाहणार आहोत या आजारांवर कोणते घरगुती काढे उपयुक्त ठरतात.
ताप
![](http://enavakal.com/wp-content/uploads/2020/08/fever.jpg)
एक ग्लास पाण्यात कडू किराईताच्या बारीक काड्यांचे एक चमचाभर तुकडे घालून पाणी उकळवावे. पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर ते गाळून गरमा गरम प्यावे. यामुळे ताप उतरतो.
आले, तुळशीची पाने, धणे पावडर यांचाही गरम गरम काढा प्यायल्यास आराम मिळतो. तापात अंगदुखी जाणवत असेल तर याच काढ्यात दोन काळी मिरी कुटून टाकल्यास अंगदुखी कमी होते.
सर्दी
![](http://enavakal.com/wp-content/uploads/2020/08/GettyImages-854418348.jpg)
पातीचहा, आले, धणे, बडीशेप, तुळशीची पाने, काळी मिरी, लवंग, ज्येष्ठ मध इत्यादी पाण्यात उकळवावे. पाणी छान उकळल्यानंतर काढा गाळावा. त्यात थोडी खडीसाखर घालून गरम गरम प्यायला द्यावा.
दिवसातून दोन-तीन वेळा हा काढा प्यायल्यास शिंका, नाक वाहणे, डोके जड होणे, डोके दुखणे या सर्व तक्रारींपासून आराम मिळतो.
खोकला
![](http://enavakal.com/wp-content/uploads/2020/08/5e6a7be0235c1828712d40da.jpg)
एका ग्लासात पाणी घेऊन त्यात कुटलेली आळशी आणि ज्येष्ठ मध घालावे. हे पाणी उकळवून त्यात खडीसाखर घालून प्यावे. त्यामुळे खोकला कमी होतो.
त्याचबरोबर आळशी, ज्येष्ठमध आणि ओल्या हळदीच्या तुकड्याचा काढा सुक्या खोकल्यात गुणकारी आहे.
खोकल्याने दम लागत असल्यास लवंग, जायफळ, आले, काळी मिरी, ओवा आणि ज्येष्ठ मधाचा काढा खडीसाखर घालून गरमा गरम प्यावा. याने त्वरित आराम मिळतो.
अपचन
![](http://enavakal.com/wp-content/uploads/2020/08/Abdominal-Pain.jpg)
पावसाळ्यात अनेक प्रकारचे अपचनाचे विकार होतात. या विकारांवर मात करण्यासाठी सुंठ पावडर, आले, जिरे, ओवा, धणे, बडीशेप, मिरी-पिंपळी पावडर अशा पाचक द्रव्यांचा काढा प्यायल्याने आराम मिळतो.
तसेच गूळ किंवा खडीसाखर घालून नुसत्या सुंठीचा काढा प्यायल्यासही पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो.