संतापजनक! मुंबईत चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Rape.jpg)
मुंबई – घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 29 जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली असून पोलिसांनी याविरोधात कारवाई केली असून तिघांना अटक केली आहे. पीटीआयने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
29 जुलैच्या मध्यरात्री लिंक रोडवरून मुलगी एकटी चालत जात होती. तेवढ्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. कारमधील तिघांनी तिला आत खेचलं आणि तेथून पळ काढला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पश्चिम द्रुतगती मार्गावर तिला सोडून दिलं असं पोलिसांनी सांगितलं आहे.
गेल्या आठवड्यात मानखूर्द पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मानखूर्दमधील शिवाजी नगर येथून तिन्ही आरोपींना ८ ऑगस्टला अटक केली. आरोपींची नावे सोनू उर्फ दीपक सिंग (२५), नुरुल नलवर (२५) आणि बाबू हकीम अन्सारी (२२)अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींवर अपहरण, बलात्कार तसंच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमधील एकजण इलेक्ट्रिशिअन तर दुसरा चालक म्हणून काम करतो. तिसरा आरोपी बेरोजगार आहे. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या कारकडे टॅक्सी परवाना आहे. सर्व आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती झोन ६ चे डीसीपी शशीकुमार मीना यांनी दिली आहे.