Online Communication : बाबासाहेबांचे विचार संपूर्ण विश्वासाठी मार्गदर्शक – डॉ. एन. एस. उमरानी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
बाबासाहेबांनी केलेले लेखन हे अंधकारातून प्रखर प्रकाशाकडे घेऊन जाणारे आहे. त्यामुळे ते फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमरानी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झूम मीटिंग ॲपवर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, व्याख्याते डॉ. एस. एम. तांबोळी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे यांनी अतिशय कमी वेळामध्ये आयोजित एका वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम आयोजनामागे असलेले उद्देश व महत्व स्पष्ट केले. तसेच अनेक महापुरुषांच्या जयंती साजरी करत असताना त्याचे स्वरूप कसे असावे व ते साजरी करत असताना समाजासाठी विशेषता तरुण पिढी घडण्यामागे त्यांचे काय योगदान असते याबद्दल थोडक्यात माहिती दिली.
याप्रसंगी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झालेले डॉ. एस. एम. तांबोळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व त्याच लोकांना समजू शकते ज्यांना आपल्या मनातील पूर्वग्रह मोडायचे आहेत, चारित्र्य घडवायचे आहे व आपल्यातील न्यूनगंड हटवायचे आहेत. ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीच्या परिस्थिती व कार्याचा मूल्यमापन करतो तेव्हा संपूर्ण जगामध्ये आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतके महामानव झालेले दिसतात, ज्याच्या मध्ये अग्रक्रमाने बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, या क्षेत्रांमधील योगदानाबद्दल माहिती देत असताना त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये असलेल्या योगदानाबद्दल माहिती देताना नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचं एक बोलक उदाहरण त्यांनी उपस्थितांना दिलं.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, बाबासाहेबांनी लोकशाहीच्या विकासामध्ये प्रमुख अडथळा मांडलेल्या हुकूमशाही व माणसामाणसांमध्ये भेद करणारी संस्था या दोन गोष्टीं सध्या वाढीस लागलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे व अश्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांना पुन्हा एकदा उजळणी द्यावे लागेल असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमरानी म्हणाले की, बाबासाहेबांनी केलेले लेखन हे अंधकारातून प्रखर प्रकाशाकडे घेऊन जाणारे आहे. त्यामुळे ते फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहेत. तसेच संकुचित विचार हे सांगावे लागत नाहीत परंतु उदात्त विचार समाजापर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे व ही भूमिका शिक्षकांना पार पाडायची आहे. देशाच्या संरक्षणासाठी लष्कर व पोलीस आहेत. परंतु, समाजाच्या संरक्षणासाठी नवीन पिढी तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे मत व्यक्त केले.
जेव्हा माणूस गुलाम होतो तेव्हा त्याचे अर्धे सद्गुन नाहीसे होतात व कायदे आले म्हणून लोकशाही अस्तित्वात आली असं होत नाही. तर त्यासाठी समाजात सत्सद विवेक जागृत होणे आवश्यक आहे, असे विचार व्यक्त केले व समाजामध्ये सगळीकडे अनिश्चितता व नैराश्याचं वातावरण असताना असे प्रभावी विचार मंथन घडवून आणल्याबद्दल बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विशेष अभिनंदन केले.
डाॅ. धनंजय लोखंडे व अण्णा बोदडे, डाॅ. विलास आढाव यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्य हे सर्वव्यापी आहेत. त्यांना संकुचीत भावनेने पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल करण्यासाठी त्यांचे मोठेपण समाजाला समजावून द्यावे लागेल असे मत अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. जितेंद्र वडशिंगर यांनी केले. सदर ऑनलाइन व्याख्यानासाठी बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयातून अनेक प्राध्यापक सहभागी झाले होते.