कोरोनासह ‘सारी’चे संकट, अकरा दिवसात दहा जणांचे बळी

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता ‘सारी’चे नवे संकट उभे ठाकले आहे. अकरा दिवसात सारीने (सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) दहा जणांचे बळी घेतले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे संकट आल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील सारीच्या 23 रूग्णांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
सारीच्या रूग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे आहेत. रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात 29 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत 103 रूग्णांनी उपचार घेतले. यातील 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.‘सारी’ या आजाराने अकरा दिवसात दहा जणांचे बळी घेतले असून शहरातील सारीच्या रूग्णांची संख्या 103 वर पोहचली आहे. सद्यस्थितीत सारीच्या 23 रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने साथीच्या आजाराने डोके काढण्यास सुरूवात केली.
खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे, उलट्या आदी आजाराने त्रस्त रूग्ण वाढत गेले. कोरोना व्हायरसप्रमाणे सारी या आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत.





