#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी
‘ज्यांनी वडिलांच्या पुण्याईवर आपले आयुष्य चालू केले, त्याच पुण्याईवर महापालिकेत थेट पद्धतीने जनतेच्या कररुपी महसुलाची लूट चालविली आहे. त्या अमोल थोरातांनी पंतप्रधानांनी सांगितले म्हणून दिवे लावण्याऐवजी शहरातील जनतेसाठी काहीतरी ‘दिवे’ लावावे, अशा शब्दात पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अमोल थोरात यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिवे’ लावण्याचे केलेल्या आवाहनावर बनसोडे यांनी टीका केली होती. यावर भाजपाचे संघटन सरचिटणीस असलेल्या अमोल थोरात यांनी बनसोडे यांच्या टीकेला पत्रक काढून उत्तर दिले होते. यानंतर आता पुन्हा बनसोडे यांनी थोरात यांच्यावर सडकून टीका करताना त्यांची औकातच दाखवून दिली आहे. याबाबत बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अमोल थोरात यांची ओळख काय आहे? शहरातील नागरिकांसाठी त्यांचे योगदान काय आहे? वडिलांच्या पुण्याईवर भाजपाची पदे उपभोगने आणि पदांच्या माध्यमातून महापालिकेत दुसर्यांच्या नावावर ठेके घेणे आणि महापालिकेची पर्यायाने जनतेच्या पैशांची लूट करणे हा एकमेव धंदा असणार्या अमोल थोरात यांनी टिका करणे ही बाबच हास्यास्पद आहे. पंतप्रधानांच्या हास्यास्पद करामतींचे समर्थन करण्यापेक्षा शहरातील गरीब, गरजू लोकांना खरोखरची मदत केल्यास अमोल थोरात किमान ‘सूज्ञ’ असल्याचे तरी सिद्ध होईल, असा सल्लाही आ. बनसोडेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.
देशातील वाढत्या ‘कोरोना संकटामुळे’ सगळे चिंताक्रांत असताना देशाच्या पंतप्रधानांकडून आरोग्य सेवेत वाढ, कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना, नागरिकांना मिळणार्या सोयी- सुविधा, जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता अशा बाबींवर धीराचे दोन शब्द ऐकायला मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी भारतीयांना घरी बसल्या बसल्या आणखी एक टाईमपास करण्याची ‘सुसंधी’ दिली. या पार्श्वभूमीवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही पंतप्रधानांनी दिवे लावायचे सांगण्याऐवजी गरीब, गरजू लोकांना अन्नधान्य तसेच भोजन पुरविण्याची मागणी केली होती. यावर चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी आ. बनसोडे यांच्यावर अत्यंत वैयक्तिक टीका केली होती.
या टीकेला उत्तर देताना आ. बनसोडे म्हणाले की, ‘बोलण्याची बढाई आणि चिलटांची लढाई’ ही तर भाजपची खरी ओळख आहे. सध्या आपल्या उंबरठ्यापर्यंत ‘कोरोना’चे संकट येऊन पोहोचले आहे. राज्यसरकार आणि विशेष करून आरोग्य विभाग या संकटावर मात करण्यासाठी दिवसरात्र झुंजत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करण्याइतका मोठेपणा भाजपकडे नक्कीच नाही, पण या काळात आपले प्राधान्यक्रम काय असावे, याचेही या लोकांना भान नाही, हे किती दुर्दैवी? या काळातही राज्यातले भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना मदत करणे सोडून पंतप्रधानांच्या कोषात आपली मदतनिधी जमा करण्याचा कोतेपणा दाखवतात, हीच यांची ‘संघभावना!’ केंद्राची खुशमस्करी करणार्यांना राज्यशासनाकडे मागणी करण्याचा नैतिक अधिकारही राहिला नसल्याचे बनसोडे म्हणाले.
वडिलांच्या पुण्याईवर पदे उपभोगणार्या अमोल थोरातसारख्या व्यक्तीकडूनही चांगुलपणाची अपेक्षा ठेवणे हा मोठा विनोदच होईल. त्यांनी किमान राज्य शासन करीत असलेल्या उपक्रमाची माहिती घेणे गरजेचे होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा, पुरेसे अन्नधान्य मिळण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग रात्रंदिवस काम करत आहे. तीन दिवसांत 28 लक्ष 61 हजार 85 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 6 लक्ष 94 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी जाहीर केली आहे. यामध्ये सुमारे 3 लक्ष 83 हजार क्विंटल गहू, 3 लाख 01 हजार क्विंटल तांदूळ, तर 3 हजार 564 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. तसंच स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे अडकलेल्या सुमारे 1 लक्ष 67 हजार शिधापत्रिका धारकांनी राज्यात ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र, केंद्रासरकारची टिमकी वाजविण्यात मश्गुल असणार्या अमोल थोरातांसारख्या ‘अंध भक्तां’ना राज्यातल्या या घडामोडी कशा दिसणार? त्यासाठी प्रत्येक गोष्टीत घाणेरडे राजकारण करण्याचे आणि अंधभक्तीचे झापड दूर करून ‘माणुसकी’ जपण्याची मानसिकता लागते. ती अमोल थोरात या तथाकथित वडिलांच्या पुण्याईवर पालिकेची लूट करणार्या व्यक्तीकडे असण्याची सुतराम शक्यता नाही!
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु असून राज्यातील या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक सोयी सुविधा व अन्नधान्य पुरेशा प्रमाणात मिळावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहिती ‘पुण्याईखोर’ अमोल थोरात यांनी घ्यावी, एवढीच माझ्यासारख्याची माफक अपेक्षा आहे. अन्यथा ‘वेड्यांचा बाजार आणि मूर्खांच्या हाती कारभार’ असे म्हणण्याची वेळ भाजपावर येईल, असा सणसणीत टोला आ. बनसोडे यांनी लगावला.
त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा आरोप-प्रत्यारोपाचा सामना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.




