#CorornaVirus: करोनाची धास्ती त्यात गारांचा पाऊस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/raj04-1.jpg)
लातूर, बीड, परभणी जिल्ह्य़ांत पिकांचे नुकसान
लातूर ।
करोना विषाणूच्या भीतीचे ढग गडद झालेले असतानाच मंगळवारी रात्री बीड आणि परभणी जिल्ह्य़ात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला. तर बुधवारी दुपारी लातूर जिल्ह्य़ातील वातावरण ढगाळ बनले. संध्याकाळी लातूर, अहमदपूर, औसा या तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. आधीच करोना आजाराची भीती असताना पाऊस झाल्यामुळे सर्दी-पडशाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल काय अशी भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बीडमध्ये उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून धोंडराई व गंगावाडीत वीज पडून गाय आणि बल ठार झाले. तर खळवट लिंबगाव (ता.वडवणी) येथे वीज पडल्याने शेतकरी तुकाराम आश्रुबा खंडुळे जखमी झाले.
बीड जिल्ह्यात मंगळवारपासून करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालयांसह बहुतांशी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा प्रकारचे आदेश दिले. थंड वातावरण आणि संपर्काने करोना विषाणूचा संसर्ग होतो या भीतीने सर्वत्रच ग्रामीण भागातील नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत. उन्हाची तीव्रता असल्याने आपल्याकडे या विषाणूचा फारसा प्रादुर्भाव होणार नाही असे मानले जात असतानाच मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह अनेक भागांत गारपीट झाली. खामगावमध्ये गारांचा पाऊस झाला. तर गंगावाडी, धोंडराईत शेतकरी अंकुश भीमराव नवले यांच्या शेतात वीज पडल्याने लिंबाच्या झाडाला बांधलेले बैल आणि गाय जागीच ठार झाले. गारांच्या पावसामुळे हातात आलेला हरभरा, गहू, ज्वारी ही रब्बीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. करोनाच्या धास्तीने भाजीपाला शहरात जायचा बंद झाला. त्यात गारपिटीने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट आले आहे.