#CoronaVirus : हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बालाही करोनाची लागण
करोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका चीन पाठोपाठ इटली आणि अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आपतकालीन आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना या विषाणूची लागण झाली असून उपचारांसाठी त्यांना घरातील एका खोलीत ठेवण्यात आलं आहे. टॉम हँक्स आणि अभिनेत्री ओल्ग कुरिलैंको यांच्यानंतर आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बानेही सोशल मीडियावर त्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याने स्वतःचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि तो करोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट केलं.
इदरिसने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याला करोना विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं. तसेच याची कोणतीही लक्षणं त्याला जाणवत नसल्याचंही तो म्हणाला. त्याची प्रकृती चांगली असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.
त्याने ट्वीट करत म्हटलं की, ‘आज सकाळी मला कळलं की मी करोना पॉझिटीव्ह आहे. मला बरं वाटतंय आणि अजूनपर्यंत करोनाची कोणतीही लक्षणं माझ्यात जाणवतं नाहीयेत. असं असलं तरी मी स्वतःला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं आहे. सर्वांनी घरात रहा आणि योग्य ती काळजी घ्या. घाबरण्याचं काही कारण नाही. मी माझ्या तब्येतीबद्दल वेळोवेळी सांगत राहीन.’