अजितदादा.. हे उपमुख्यमंत्री नव्हे तर मुख्यमंत्रीच वाटतात – चंद्रकांत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/9-3.jpg)
पुणे |महाईन्यूज|
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रेमळ आहेत. डायनॅमिक लीडर आहेत. ते उपमुख्यमंत्री आहेत, पण मुख्यमंत्रीच वाटतात, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांची मुक्तकंठाने स्तुती केली. चंद्रकांत पाटील यांच्या या स्तुतीमुळे उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हीएशन गॅलरीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी अजित पवार यांची मुक्तकंठाने स्तुती केली. अजितदादा चेहऱ्याने रागीट वाटतात, पण ते प्रेमळ आहेत, असं सांगतानाच दादा, तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची गरज पडत नसेल. कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असं पाटील म्हणाले. तेव्हा कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांच्या भुवया उंचावल्या. एवढंच नव्हे तर पाटील यांनी अजितदादा यांना डायनॅमिक लीडर म्हणूनही संबोधले.
प्रत्येक जिल्ह्यात छोटसं विमानतळ असावं. सर्व नियम पूर्ण करणारे हेलिपॅडही प्रत्येक जिल्ह्यात असावेत. एमर्जन्सीच्या काळात त्याचा उपयोग होतो, अशी मागणी करतानाच अजितदादा डायनॅमिक लीडर आहेत. ते आमच्या मागण्या पूर्ण करतील. त्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचीही गरज नाही. तेच स्वत: मुख्यमंत्री आहेत, असं पाटील म्हणाले.