पहिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सवास उदंड प्रतिसाद
मुंबई |महाईन्यूज | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ठराविक समाजाचे नेते नव्हते ते भारताचे नेते होते, आणि हाच संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक कला प्रेमी सुद्धा होते, त्यांना सर्व कला आणि साहित्याबद्दल आदर आणि सखोल ज्ञान होते आणि याच विचारांनी प्रभावित होऊन डॉ प्रल्हाद खंदारे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सवा’चे आयोजन केले होते. १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यान मुंबईतल्या प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे हा कलामहोत्सव रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगला.
१४ फेब्रुवारीला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या समारंभाला महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, भिमराव आंबेडकर, किरण शांताराम आणि शिल्पकार विनय वाघ तसेच डॉ. राजेंद्र गवई हे मान्यवर उपस्थित होते. अनेक पुरस्कार विजेते शाहीर यशवंत जाधव यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात युगपुरुषाच्या पोवाड्यानी कला महोत्सवाची दमदार सुरुवात करून दिली. कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसात ‘जयजयकार’ हा वेगळा आणि महत्वाचा सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाचे स्क्रीनिग झाले या नंतर तालीम निर्मित डॉ विजया राज्याध्यक्ष यांच्या कथेवर आधारित “पै पैशाची गोष्ट” या इला भाटे अभिनित नाटकाने मागच्या पिढीला आताच्या पिढीशी हळूवारपणे जोडून दिले. भारतातील समग्र दलित चळवळीचा घेतलेला मागोवा “आय एम नॉट दलित” या माहितीपटातून सादर झाला, डॉ. खंदारे यांनी अनुभवलेला संघर्ष आणि चळवळीचा लेखाजोखा या माहितीपटाद्वारे समाजासमोर आला आहे. या माहितीपटाबद्दल मुक्त पत्रकार सुबोध मोरे आणि सुरेश केदारे यांच्यासमवेत माहितीपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक भगवान खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांच्याशी विस्तारित उद्बोधक चर्चा केली. या चर्चासत्रांनंतर राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित झालेल्या माया खुटेगावकर आणि मंडळीचा “अहो, नादच खुळा” हा लावणीचा कार्यक्रम सादर झाला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते.
कलामहोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात युगपुरुषाच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा “रमाई माझी माऊली” हा सांगीतिक कला आविष्कार संगीतकार जॉली मोरे आणि महिला शाहीर सीमा पाटील यांच्या कल्पनेतून सादर झाला. यानंतर लेखिका नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या मराठी कादंबरीवर आधारित आणि एका गंभीर प्रश्नावर आवाज उठवणारा समीर सुर्वे दिग्दर्शित आणि डॉ प्रल्हाद खंदारे निर्मित “जजमेंट” या चित्रपटाचे स्क्रीनिग करण्यात आले. या कलामहोत्सवाच्या सरत्या क्षणात चित्रपटासोबतच “व्हय मी सावित्रीबाई !” हे सावित्रीबाई यांच्या जडणघडण आणि शिक्षण चळवळीतील त्यांचं कार्य आणि त्या आयुष्याशी माणूस म्हणून कसे भिडले याच दर्शन हा नाट्यप्रयोग सादर झाला. या नाट्यप्रयोगाचे लेखन दिग्दर्शन सुषमा देशपांडे यांनी केले असून शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने यानी ते सादर केले. गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गजल आणि शेर शायरीच्या सुरेल मैफिलीने रसिकाच्या अलोट गर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सवाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे चोख आणि नेटके आयोजन महोत्सव संचालक म्हणून समीर सुर्वे आणि हर्ष मोहन कृष्णात्रेय यांनी केले.अनेक स्तरातून आलेले अनेक कलाकार आणि राजकीय अराजकीय मंडळी या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसली असून पुढच्या वर्षी सुद्धा असाच किंबहुना याहून मोठा कला महोत्सव सादर होईल याची ग्वाही डॉ. प्रल्हाद खंदारे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जननायक होते, ते एकाच समाजपुरते मर्यादित नसून ते सगळ्यांसाठी आहेत आणि सगळ्यांचे राहणार, आंबेडकरी चळवळ मी गेली ३० वर्षे जवळून अनुभवतोय आणि त्यातूनच ही कल्पना जन्माला आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कलाप्रेमी होते आणि त्यांना प्रत्येक कलेविषयी प्रेम आणि आदर होता म्हणून हा कला महोत्सव आयोजन करण्याचे ठरवले. अनेक कलाकार आणि त्यांची कला यांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी हा एक प्रयत्न होता आणि तो मी सातत्याने करत राहीन.
– डॉ. प्रल्हाद खंदारे – आयोजक.