अधिकारी, कर्मचा-यांच्या होणार बदल्या, अर्ज मागविण्याचे विभागप्रमुखांना आदेश
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. एकाच विभागात तीन वर्ष किंवा सहा वर्ष सेवा कार्यकाळ पूर्ण करणा-या अधिकारी व कर्मचा-यांची बदली करण्यात येणार आहे. तसेच, वैद्यकीय आणि विनंतीपूर्वक अर्ज केल्यास संबंधितांचा बदलीसाठी विचार केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क आणि ड श्रेणीतील कर्मचा-यांच्या बदलीचा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी काढला आहे. त्यानुसार गट अ आणि ड मधील बदलीस पात्र ठरणा-या अधिकारी व कर्मचा-यांची यादी तयार करावी. ज्या अधिकारी व कर्मचा-यांना वैद्यकीय अथवा अन्य कोणत्या कारणास्तव अन्य ठिकाणी बदली करवून घ्यावयाची असल्यास त्यांचे रितसर अर्ज मागविण्यात यावेत. ते अर्ज 15 फेब्रुवारी पर्यंत रितसर कागदपत्रांसह प्रशासन विभागाकडे सादर करावेत, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
जानेवारी अखेरच यादी अथवा अर्ज करावेत
गट अ आणि ब मधील बदलीस पात्र ठरणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच विभागात तीन वर्षे काम करता येणार आहे. गट क मधील बदलीस पात्र असलेले अधिकारी व कर्मचारी यांचा सेवाकालावधी सहा वर्षाचा आहे. मात्र, विभागांतर्गत त्यांचा पदभार तीन वर्षानंतर बदलण्यात येणार आहे. गट अ आणि क मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या केवळ एप्रिल आणि मे महिन्यातच होणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुखांना गट अ ते क मधील बदलीस पात्र अधिकारी, कर्मचा-यांची यादी 31 जाेनेवारी पर्यंत सादर करावी लागणार आहे. गट अ ते क मधील अधिकारी व कर्मचा-यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असल्यास त्यांनी 1 ते 31 जानेवारी पर्यंत अर्ज प्रशासन विभागात सादर करणे बंधनकारक आहे.
…तर कोणत्याही क्षणी बदली होणार
यादी व अर्जांची छानणी केल्यानंतर दरवर्षी एप्रिल व मे अखेर संबंधितांची बदली होणार आहे. सेवानिवृत्ती, पदोन्नती, पदावनती, राजीनामा, रिक्त पदे भरणे तसेच तक्रारी आदी कारणास्तव रिक्त पदांवर कोणत्याही वेळी बदली केली जाऊ शकते. बदलीपात्र अधिकारी किंवा कर्मचारी यांचा बदलीचा प्रस्ताव संबंधित विभागप्रमुखाने 31 जानेवारी अखेर पाठवणे बंधनकारक आहे. तो प्रस्ताव प्रशासनाकडून आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. एकाच विभागातील किंवा कार्यालयातील 30 टक्के अधिकारी किंवा कर्मचा-यांच्या बदल्या शक्य आहेत. गट अ ते ड मधील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याबाबत कोणतीही तक्रार आल्यास ती योग्य निदर्शनास आल्यास संबंधितांची कोणत्याही क्षणी बदली होऊ शकते. गट ड मधील कर्मचा-यांनी बदलीसाठी विनंती अथवा अर्ज केल्यास त्यांची बदली होऊ शकते, अशा नियम अटी लागू करण्यात आल्या आहेत.
संबंधित विभागप्रमुखांनी प्रस्तुत नियम व अटींनुसार कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.