चोर म्हटल्याने नगरसेवकांचा सभागृहात संताप, पक्षनेत्याला भरचौकात काळे फासणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/PCMC-2.jpg)
- खासगी वाटाघाटीच्या विषयात नगरसेवकांच्या चौकशीची मागणी आंगलट
- पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर भाजपसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची टिका
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भाजपचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी तीन दिवसांपूर्वी खासगी वाटाघाटीच्या विषयात हित जोपासणा-या नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आज सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह विरोधकांनी पवार यांच्यावर टिका केली. ”आम्ही चोर आहोत हे पक्षनेत्यानी सिध्द करावे” ”अन्यथा त्यांना भर चौकात काळे फासणार”, असा संताप व्यक्त करत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सभागृह दणाणून सोडले.
महापालिकेची डिसेंबर महिन्यातली तहकूब सभा आज शुक्रवारी (दि. 10) पार पडली. शहरातील 500 चौरस फुट बांधकामांना मिळकत कर माफीचा प्रस्ताव भाजपकडून नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी सभागृहात मांडला. नगरसेवक नामदेव ढाके यांनी उपसूचना वाचून दाखविली. त्याला अनुमोदन हर्षल ढोरे यांनी दिले. यावरून विरोधकांनी सभागृहात भाजपच्या विरोधात नारेबाजी केली. एवढे दिवस भाजपचे पदाधिकारी झोपा काढत होते का ?. नेमके आताच हा विषय समोर आणण्याचे कारण काय ?. कोणाच्या भल्यासाठी 500 चौरस फुटाला मिळकत कर माफ करण्याचा प्रस्ताव तयार केला, अशा शब्दांत विरोधकांनी सत्ताधा-यांचे वाभाडे काढले.
500 चौरस फुट घराला मिळकत कर माफीचा प्रस्ताव मंजुरी करून बांधकाम व्यवसायिकांचे भले करण्याचा भाजपचा स्पष्ट हेतू दिसतो. अपवाद वगळता शहरातील बहुतांश नागरिकांची घरे 500 चौरस फुटापुढील आहेत. जर, या निर्णयाचा नागरिकांना फायदाच होत नसेल तर हा प्रस्ताव शासनाकडे कशासाठी पाठवायचा ?, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. यावरून उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन भाजप महापौर उषा ढोरे यांनी घाईघाईत हा विषय उपसूचनेसह मंजूर केला. परंतु, या विषयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला.
विरोधकांकडून पक्षनेत्याचा निषेध
त्यातच तीन दिवसांपूर्वी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी खासगी वाटाघाटीच्या विषयात आर्थिक हित जोपासणार्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच, शहरातील माजी नगरसेवकांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकत एकूण किती जागेत आहे, आणि मिळकतकर किती जागेचा भरला जातो, हे जनतेसमोर ठेवण्याची मागणी केली होती. याचे सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. परंतु, काही घरगुती कारणास्तव सभागृह नेते एकनाथ पवार आज सभेला गैरहजर होते. सभेच्या सुरूवातीलाच माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी एकनाथ पवार यांचा जाहीर निषेध केला.
भाजपकडून अपयश लपविण्याचा प्रयत्न
यावेळी दत्ता साने म्हणाले की, नगरसेवक महापालिकेत चोर्या करायला येतात का ? कोणते नगरसेवक चोर आहेत? त्यांची सभागृहात पवारांनी नावे जाहीर करावीत. अन्यथा, पक्षनेते पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार, असा इशारा साने यांनी दिला. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील पवार यांचा निषेध व्यक्त केला. कोण वाटाघाटी करते ? कोणाची थकीत बिले आहेत ? असा सवाल करत पक्षनेते स्वतःचे अपयश लपविण्यासाठी अशी पत्रके काढत आहेत. सभागृह नेत्यांनी सभागृहात येऊन माफी मागावी, अशी मागणी कलाटे यांनी केली.