‘पानिपत’चा वाद, आता क्रिती सॅननच्या संवादावरून पेटले रान!!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/panipat.rr_.jpg)
इतिहासाची पाने चाळणारे सिनेमे अनेकदा वादात सापडतात. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा सिनेमा त्यापैकीच एक. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमधील एका संवादावरून सध्या रान माजले आहे. होय, ट्रेलर रिलीज झाल्याच्या आठवड्यानंतर पेशवा बाजीराव यांच्या वंशजांनी या चित्रपटाची हिरोईन क्रिती सॅनन हिच्या तोंडी असलेल्या एका संवादावर आक्षेप नोंदवला आहे. याविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली असून त्यास उत्तर न दिल्यास कोर्टात धाव घेण्याचा इशारा बाजीराव पेशव्यांचे वंशज नवाब शादाब अली बहादूर यांनी दिला आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. ‘मैने सुना है जब पेशवा अकेले मोहिम पर जाते है तो एक मस्तानी के साथ लौटते है’ असे क्रिती यात म्हणताना दिसतेय. नेमक्या चित्रपटातील याच संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे.
नवाब शादाब अली बहादूर यांनी हा संवाद आक्षेपार्ह असल्याचे सांगत चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता गोवारीकर, रोहित शेलाटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना नोटीस पाठवले आहे. चित्रपटात हा संवाद अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला गेला आहे. या संवादातून मस्तानी साहिबांसोबतच पेशव्यांचीही चुकीची प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मस्तानीबाई या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. चित्रपट आणि ट्रेलरमधील हा संवाद वगळण्याविषयीची नोटीस मी निर्माते व दिग्दर्शकांना पाठवली आहे. त्यांनी नोटीसला प्रतिसाद न दिल्यास मी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेईन, असे नवाब शादाब अली बहादूर यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. हा संवाद चित्रपटातून गाळण्यात यावा, अशी मागणीही यानिमित्ताने त्यांनी केली आहे.