उद्धव ठाकरेंनी ठणकावले; सत्तेसाठी माझ्याकडे अन्य पर्याय उपलब्ध!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/uddhav.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. सत्तेमध्ये समान वाटा व अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शनिवारी लावून धरली. खुद्द उद्धव ठाकरेंनी ‘सत्ता स्थापनेसाठी सेनेसमोर इतर पर्याय आहेत. मात्र भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आहे, सत्तासुद्धा तशीच असावी. इतर पर्याय चोखाळण्याची वेळ आमच्यावर येऊ नये,’ असा इशारा दिला. दुसरीकडे, मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष असून शिवसेना-भाजप युती स्थिर सरकार देईल; दिवाळीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होतील, असे सांगितले.
तत्पूर्वी, शिवसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अन् सत्तेत समान वाटा याची लेखी हमी मिळेपर्यंत भाजपशी चर्चा करू नका, असा आग्रह आमदारांनी धरल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. उद्धव यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, देवेंद्र फडणवीस व आपल्यात काय वाटाघाटी झाल्या, याची आमदारांना माहिती दिली. बैठकीत आमदारांनी निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव यांना बहाल केले.