ताज्या घडामोडीमुंबई

पोलीस भरतीतील तोतया उमेदवाराला ५० पैकी ४९ गुण; तिघांसाठी भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला अटक

मुंबई | पोलीस भरतीत शारीरिक चाचणीत ५० पैकी ४९ गुण मिळवणाऱ्या २५ वर्षीय तोतया उमेदवाराला भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपी तीन उमेदवारांसाठी भरतीमध्ये उतरलेला होता. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.गणेश पवार असे अटक आरोपीचे नाव आहे. भरतीत तोतयागिरी केल्याप्रकरणी ८ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या भरतीप्रक्रियेच्या लेखी परीक्षेसाठी एक लाख ९ हजार उमेदवार सहभागी झाले होते. त्यातील १० हजार ७६० जणांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. पवार याचे नाव पहिल्याच प्रकरणात निष्पन्न झाले होते. त्यासाठी दोन ते तीन लाख रुपये घेण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार उघड केला आहे.

त्यातील पहिल्या प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी जालना येथील रहिवासी असलेल्या भगवान टकले (२४) या तरुणाला अटक केली होती. मरोळ पोलीस मैदानात ८ डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या शारीरिक चाचणी परीक्षेत त्याने स्वत:ऐवजी विशाल गुसिंगे या तरुणाला उतरवले होते. कागदपत्रांच्या छाननीत हा प्रकार उघड झाला. दुसऱ्या प्रकरणात पोलीस भरतीतील शारीरिक चाचणीमध्ये तोतया उमेदवार उतरवल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सतीश मोरे या औरंगाबादमधील तरुणाला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात अटक केली होती. तिसऱ्या प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी २२ जानेवारीला बाळानाथ पवार (३०) या बीडमधील तरुणाला अटक केली होती. त्याच्याविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १६ डिसेंबरला भोईवाडा पोलिसांच्या हद्दीतील नायगाव पोलीस मैदानात बाळानाथ याची कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. त्या वेळी बाळानाथचे छायाचित्र व स्वाक्षरीचा नमुना घेण्यात आला होता. त्यानंतर १७ डिसेंबरला बाळानाथ याला मरोळ येथील पोलीस मैदानात हजर राहून शारीरिक चाचणी द्यायची होती; पण तेथे बाळानाथच्या बदली गणेश पवार हा उपस्थित राहिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button