TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवण्यासाठी आंद्रा धरणातील २५० एमएलडी पाणी मंजूर केले : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी: भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने पिंपरी-चिंचवडकरांसाठी नियमाच्या बाहेर जाऊन आंद्रा धरणातील २५० एमलडी पाणी मंजूर केले आहे. वाढणाऱ्या या शहराची गरज लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता. हे पाणी हे पाणी लवकरच शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यातून या शहराची तहान भागवण्याचे काम निश्चितपणे पूर्ण केले जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सांगवी येथील सभेत सांगितले. तसेच पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नसता तर त्यांचा मोठेपणा दिसला असता. पण आता ठीक आहे, दिवंगत लक्ष्मणभाऊंची काय ताकद आहे हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, तुषार राठोड, प्रसाद लाड, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार अमर साबळे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, रासपचे शहराध्यक्ष भारत महानवर, प्रहारचे संजय गायके आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शहराच्या जडणघडणीत लक्ष्मण जगताप यांचा वाटा होता. ही निवडणूक आलीच नसती तर आपल्या सगळ्यांना आनंद झाला असता. परंतु, कधी कधी नियती आपल्यावर काही गोष्टी लादत असते. उमदा नेता, २४ तास विकासाची कास धरणारा, जनसामान्यांचा आवाज बनणारा नेता दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले. निवडणूक अचानक आली. कोणाचीही मानसिक तयारी नव्हती. त्यांचे कार्य समर्थपणे नेण्यासाठी त्यांच्या मागे सावलीप्रमाणे उभ्या राहिलेल्या अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. दुःखाच्या काळातही लक्ष्मणभाऊंचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.

आता मतदारांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना आशिर्वाद देऊन लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली वाहावी. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नसता, तर त्यांचा मोठेपणा दिसला असता. पण आता ठीक आहे, दिवंगत लक्ष्मणभाऊंची काय ताकद आहे हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने लक्ष्मणभाऊंच्या सावली असलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना अभूतपूर्व विजय देणार आहे. लक्ष्मणभाऊ म्हणायचे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय शहर बनण्याची ताकद आहे. त्यासाठी ते झटत होते. शहरातील वेगवेगळ्या समस्या सोवडण्यासाठी पाठपुरावा करत होते.

शास्तीकर रद्द व्हावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. मोगलांच्या काळातील जिझिया करासारखा केवळ पिंपरी-चिंचवडकरांवर हा कर लावण्यात आला होता. लोकांना मोठ्या प्रमाणात नोटीस देण्यास सुरू केले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन होते. त्यांना अचानक स्वप्न पडले आणि शहरात शास्तीकर लावला. पण भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा शास्तीकर रद्द केला. नंतर नवीन सरकार आल्यानंतर लक्षात आले की एवढ्याने नागरिकांची सुटका होत नाही. त्यामुळे शास्तीसारखा जिझिया कर संपूर्णपणे रद्द करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. त्याचा शासन आदेश काढला नाही, तर सरकारवर हक्कभंग येतो. त्यामुळे विधानसभेत केलेल्या घोषणेचा शासन आदेश काढावाच लागतो. केलेल्या घोषणेप्रमाणे नक्कीच शासन आदेश काढून शास्तीकर संपूर्णपणे रद्द करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.” यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांचीही भाषणे झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button