पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर; स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे!
मोशी येथे २० डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी

इंद्रायणी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोशी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक संदीप भानुदास तापकीर यांची, तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ तथा नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लेखक व कवी श्री अरुण बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही निवडींवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला ऐतिहासिक संशोधन, साहित्य आणि सामाजिक कार्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लेखक व कवी श्री अरुण बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे कार्याध्यक्ष सोपान खुडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, दामोदर वहिले, योगेश कोंढाळकर, श्रीहरी तापकीर, माणिक सस्ते, काळुराम सस्ते, संगीता थोरात, सुनील जाधव, तेजस्विनी देशमुख, संतोष सस्ते, अशोक ढोकले, महिपती साठे, अलंकार हिंगे, गोविंद आल्हाट आदी सदस्य उपस्थित होते.

यंदाचे पाचवे इंद्रायणी साहित्य संमेलन २० डिसेंबर रोजी मोशी येथील जयगणेश सभागृहात पार पडणार आहे. या संमेलनात नामवंत साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक आणि मान्यवरांची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार असून, साहित्यप्रेमींसाठी हा वैचारिक आणि सांस्कृतिक मेळावा ठरणार आहे.
दरम्यान, इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने नवनिर्वाचित स्वागताध्यक्ष डॉ. सुहास कांबळे आणि संमेलनाध्यक्ष संदीप तापकीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक श्रीकांत चौगुले, व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, निलेश गावडे, गणेश साहेबराव सस्ते, संतोष गोलांडे, भानुदास तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा
“ट्रम्प यांच्या पक्षावर पैसा खर्च करणं मूर्खपणा होता”; एलॉन मस्क यांना पश्चात्ताप!

साहित्य, इतिहास, संस्कृती आणि वैचारिक देवाणघेवाणीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या पाचव्या पर्वाकडे आता साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.
गड-किल्ल्यांच्या इतिहासाचे अभ्यासक संदीप तापकीर
संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले संदीप भानुदास तापकीर हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर जिल्हानिहाय आधारित त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय’ या मराठी शिवचरित्राचा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. याशिवाय शंभरहून अधिक पुस्तकांचे संपादन करण्याचे महत्त्वपूर्ण साहित्यिक कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे ‘प्रोफेशनल लीडर’ डॉ. सुहास कांबळे स्वागताध्यक्ष
स्वागताध्यक्षपदी निवड झालेले डॉ. सुहास कांबळे हे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ असून मोशी येथील साईनाथ रुग्णालयाचे संचालक आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे आणि कलेची व साहित्याची विशेष आवड असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. वैद्यकीय सेवा, सामाजिक कार्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेला त्यांचा अनुभव साहित्य संमेलनाच्या आयोजनाला निश्चितच नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे.




