“ट्रम्प यांच्या पक्षावर पैसा खर्च करणं मूर्खपणा होता”; एलॉन मस्क यांना पश्चात्ताप!

Elon Musk regrets funding Donald Trump | २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना भक्कम आर्थिक आणि राजकीय पाठिंबा देणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी आता ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) चळवळीपासून फारकत घेतली आहे. मध्यावधी निवडणुकांच्या निकालानंतर आपण या चळवळीचा भाग नसल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक अँड्र्यू रॉस सॉर्किन यांना ‘डीलबुक समिट’मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान मस्क यांनी “मी MAGA नाही” असे जाहीर विधान केले आहे.
चीनमधून व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “MAGA चा नेमका अर्थ काय हे मला माहीत नाही; परंतु जर त्याचा अर्थ रिपब्लिकन पक्षाच्या ठराविक धोरणांचे आंधळेपणाने पालन करणे असा होत असेल, तर माझ्यात ती गोष्ट नक्कीच नाही.”
विशेष म्हणजे, मस्क यांचे हे विधान त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेच्या अगदी उलट आहे. २०२४ मध्ये न्यू यॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या ट्रम्प यांच्या प्रचारसभेत मस्क यांनी, “मी फक्त MAGA नाही, तर मी डार्क, गॉथिक MAGA आहे,” अशी गर्जना केली होती.
हेही वाचा
बोरघर कोकणेवाडीत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; शिवराज लांडगे यांच्या पुढाकारातून किटवाटप
या मुलाखतीत मस्क यांनी निवडणुकीतील अवाढव्य खर्चावरही खंत व्यक्त केली. अनेक रिपब्लिकन उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी सुमारे ५० कोटी डॉलर्स (सुमारे ४,२०० कोटी रुपये) खर्च केल्याबद्दल आपल्याला खूप मूर्खपणा केल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “यावरून हे नक्कीच दिसून येते की अमेरिकन निवडणुका केवळ पैशांवर अवलंबून नसतात. जर मी वेळ मागे नेऊ शकलो असतो, तर मी नक्कीच कमी पैसे खर्च केले असते.”
ट्रम्प आणि मस्क यांच्यातील चढ-उताराचे संबंध
‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२४ ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ट्रम्प यांना जिंकून देण्यासाठी मस्क यांनी किमान २५ कोटी डॉलर्सची देणगी दिली होती. त्यानंतर २०२५ मध्ये ते ट्रम्प प्रशासनात सहभागी झाले आणि १८० दिवस त्यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) चे नेतृत्व केले. मात्र, ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी प्रशासकीय पद सोडले. गेल्या वर्षी जूनमध्ये मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर जेफ्री एपस्टाईन फाईल्समध्ये ट्रम्प यांचे नाव असल्याचा आरोप केल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला होता; परंतु नंतर दोघांनीही आपले संबंध पुन्हा सुधारले होते. आता मस्क यांच्या या नव्या विधानामुळे अमेरिकन राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.




