Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालक सचिव जिल्ह्यांना भेट देणार; चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर

चिपळूण, दिंडोरी, वाडा आणि विक्रमगड तालुक्यांना दुष्काळाचा दिलासा; पाणीटंचाई निवारणासाठी १० उपाययोजनांवर लवकरच शासन निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आवश्यक उपाययोजनांना गती देण्यासाठी पालक सचिवांनी अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेट द्यावी. दुष्काळाच्या सर्व निकषांनुसार परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

दरम्यान, चिपळूण, दिंडोरी, वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असलेल्या हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर यांसह अन्य तालुक्यांचे निकषांनुसार सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या दुष्काळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंघल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणीटंचाई निवारणासाठी दहा उपाययोजनांना प्राधान्य

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या दहा उपाययोजनांबाबत येत्या एक-दोन दिवसांत शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण झाल्यास ज्या गावांमध्ये टँकरची आवश्यकता भासणार नाही, अशा १३ तालुक्यांतील २१२ योजनांच्या कामांसाठी वित्त विभागाने ८३.१८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच रेट्रोफिटिंगसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

पाणीटंचाईच्या कामांसाठी यापूर्वीची ३४९ कोटी रुपयांची थकबाकी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध होणार असून, हा निधी डिसेंबरअखेरपर्यंत मिळेल, अशी माहिती देण्यात आली. रिचार्ज शाफ्टच्या कामांसाठी एजन्सींची संख्या वाढविण्याची आणि या कामांची दर्जात्मक मानके निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक अधिकार देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

धाराशिवमधील पाणीसाठा चिंताजनक

धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यात केवळ ५.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत नमूद केले. यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील आठ ते दहा महिन्यांचे पाणी नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

हेही वाचा –  पाटण पंचायत समितीचा ‘कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता’ कार्यक्रम सुरू; शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ

पशुधनासाठी चारा लागवडीवर भर

पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेंतर्गत मका आणि ज्वारी या चारा पिकांची लागवड करण्याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणांना कळविण्यात आले आहे. तलावांच्या बाजूला चारा लागवड करण्याबाबतही आदेश जारी करण्यात आले आहेत.

पाणीटंचाई निवारणासाठी स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्यास त्यांच्यासोबत जिल्हास्तरावर करार करून कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) निधी उपलब्ध असल्यास स्थानिक गरजेनुसार पाणीटंचाई निवारणाच्या कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असेही निर्देश देण्यात आले.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी १ एप्रिल २०२७ नंतर

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विचार करण्याची मागणी केली. त्यावर १ एप्रिल २०२७ नंतर प्रोत्साहन निधी दिला जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हास्तरावर उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. शहरी भागातील खासगी मालकीच्या विहिरींचा व्यावसायिक वापर करण्याऐवजी अशा विहिरी महानगरपालिकांच्या ताब्यात देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना प्रताप सरनाईक यांनी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यावर चर्चा

दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांचा समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group