“मध्यरात्री २ वाजता माझ्या घरावर हल्ला”; अभिषेक बॅनर्जींचा भाजपवर खळबळजनक आरोप, भाजपचे प्रत्युत्तर

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर मध्यरात्री २ वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांत आपल्यावर झालेला हा सातवा हल्ला असल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवत म्हटले की, “सलग दोन दिवस रेकी केल्यानंतर मध्यरात्री २ वाजता भाजपच्या गुंडांनी माझ्या घरावर हल्ला केला. जर देशातील एका खासदारासोबत असे घडू शकते, तर राज्यातील सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय?” यासोबतच वारंवार हल्ले होऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “न्यायव्यवस्था डोळ्यांवर पट्टी बांधून बसल्यामुळेच राज्यात गुंड उजळमाथ्याने फिरत आहेत,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
‘राइज अँड फॉल २’ चा महाविजेता ठरला शहजाद पूनावाला; ३५ लाखांच्या बक्षिसासह पटकावली मानाची ट्रॉफी
After two days of continuous recce, this is how BJP hooligans attacked my house at 2 AM today. Watch the footage and see for yourself.
If this is what can happen to an elected Member of Parliament, imagine the plight of the common man in WB.
This is the seventh attempt on my life in the last six months. Yet, there has been no police action and no judicial intervention.
Hooligans are running riot across the state because the judiciary continues to turn a blind eye.
Thank you, Milords, for remaining mute spectators! 🙏🏻
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) November 7, 2026
अमित शहा, ओम बिर्ला यांच्याकडे दाद
या घटनेपूर्वी दोन अज्ञात व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचा व्हिडिओही बॅनर्जी यांनी शेअर केला होता. “गेल्या दोन दिवसांपासून काही संशयित माझ्या घराची आणि कार्यालयाची रेकी करत आहेत. चौकशी केली असता त्यांनी स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. पण माझ्यावर अशा प्रकारे पाळत ठेवण्याचे आदेश नेमके कोणी दिले?” असा सवाल करत त्यांनी सखोल चौकशीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
भाजपने आरोप फेटाळले
दुसऱ्या बाजूला भाजपने अभिषेक बॅनर्जींचे सर्व आरोप फेटाळून लावत हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “हा वाद अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवरून झालेल्या गोंधळाचा परिणाम आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरे करून गोंधळ घातल्यास स्थानिक लोकांकडून प्रतिक्रिया उमटणारच. अभिषेक बॅनर्जींवर हल्ला करायला कोणाकडे एवढा वेळ आहे? जनतेला सांगण्यासारखे काही उरले नसल्याने लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही नौटंकी सुरू आहे.”




