राज्यातील २० जिल्ह्यांत OBC विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी जागा निश्चित; उर्वरित जिल्ह्यांना तातडीचे निर्देश
वसतिगृहांसाठी चार पर्यायी आराखडे तयार होणार; महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त भिडेवाडा, फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक विकासाला गती देण्यावर भर.

मुंबई : राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांतील जागा निश्चितीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा OBC आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. वसतिगृहांच्या इमारती, खोल्यांची रचना आणि सुविधांसाठी चार पर्यायी आराखडे तयार करून संबंधित जिल्ह्यातील उपलब्ध जागेनुसार बांधकाम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
मंत्रालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली OBC आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला उपसमितीचे सदस्य तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, विभागाच्या संचालिका सोनाली मुळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
OBC वसतिगृहांसाठी नाममात्र दराने जागा
इतर मागास बहुजन कल्याण विभागाला वसतिगृहे आणि कार्यालयांच्या बांधकामासाठी एक रुपया या नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा उपसमितीने आढावा घेतला. वसतिगृहांच्या बांधकामासाठी चार पर्यायी आराखडे तयार करून जिल्हानिहाय जागेच्या उपलब्धतेनुसार त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम
महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी ‘महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी’ या विशेष बोधचिन्हाच्या संकल्पनेची निवड करण्यात आली.
महाज्योती संस्थेने दुष्काळ निवारणाशी संबंधित कार्यक्रम तयार करून समितीसमोर सादर करावा. तसेच महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याच्या प्रती छापून वितरणासाठी उपलब्ध कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे कामही लवकर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ नायगाव, महात्मा फुले यांचे जन्मस्थळ कटगुण (जि. सातारा) आणि सत्यशोधक समाजाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांच्या जतन व विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. पुण्यातील प्रस्तावित एकत्रित संकुलाच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सादरीकरणावरही चर्चा झाली.
हेही वाचा – सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी आता ऑनलाइन अर्ज; २ लाखांहून अधिक बालकांना लाभ
फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचा विकास करणार
पुण्यातील फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले. राज्य संरक्षित फुलेवाड्यापासून सुमारे १५० मीटर अंतरावर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीतील सावित्रीबाई फुले स्मारकाला जोडणारा रस्ता विकसित करावा. तसेच फुलेवाडा परिसरातील आवश्यक जागांचे भूसंपादन करून स्मारक विस्ताराची कामे वेगाने पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठे आणि शालेय अभ्यासक्रमांत फुले दाम्पत्यांच्या विचारांचा समावेश
राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अध्यासनांची स्थापना करण्याची सूचना उपसमितीने केली. विद्यमान अध्यासनांवरील रिक्त पदे तातडीने भरून ती कार्यरत करावीत, असेही निर्देश देण्यात आले.
विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह CBSE, राज्य मंडळ आणि अन्य शिक्षण मंडळांच्या शालेय अभ्यासक्रमांत महात्मा फुले यांच्या साहित्याचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
फुले दाम्पत्यांचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणार
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी शासनाच्या वतीने परदेशातील विद्यापीठांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, फेलोशिप आणि शिष्यवृत्ती योजना राबविण्याचाही विचार करण्यात आला.
याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी विशेष उपक्रम राबवावेत, तर शाळा आणि महाविद्यालयांनी व्याख्यानमाला, निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावे, अशी सूचना करण्यात आली. प्रत्येक शाळेत ११ एप्रिल रोजी प्रभातफेरी, अभिवादन कार्यक्रम आणि विशेष व्याख्यान आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.




