Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी आता ऑनलाइन अर्ज; २ लाखांहून अधिक बालकांना लाभ

महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करण्याची सुविधा सुरू; कागदपत्रांची संख्या कमी, प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा २,२५० रुपये मिळणार.

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून, अर्ज नोंदणीपासून ते अर्जाची सद्यस्थिती तपासण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्रालयात बालसंगोपन योजना आणि फिरते पथक योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त वर्षा लड्डा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अर्ज प्रक्रिया झाली अधिक सोपी आणि पारदर्शक

शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाच्या अनुषंगाने बालसंगोपन योजनेच्या अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या सर्व टप्प्यांमध्ये सुसूत्रता आणण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.

यामुळे अर्जदारांना अर्ज करणे अधिक सोपे होणार असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज केल्यानंतर त्याची सद्यस्थितीही ऑनलाइन तपासता येणार आहे.

हेही वाचा –  शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा होणार कायापालट; मेट्रो-रेल्वेशी जोडले जाणार अत्याधुनिक बस पोर्ट

दरमहा २,२५० रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात

या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुलभता येईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

अर्जदारांना महाडीबीटी पोर्टल वर जाऊन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्जाची सद्यस्थितीही याच पोर्टलवर पाहता येईल.

कोणाला मिळतो बालसंगोपन योजनेचा लाभ?

० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर तसेच अन्य प्रकारे गरजू बालकांचे संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते.

या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला प्रतिमहा २ हजार २५० रुपये, तर संबंधित संस्थेला २५० रुपये असे एकूण २ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने जमा करण्यात येते. सध्या या योजनेचा लाभ सुमारे २ लाख ८ हजार बालकांना मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group