वराळे येथे ‘ड्रग फ्री इंडिया’ अभियानांतर्गत भव्य जनजागृती कार्यक्रम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वराळे, पुणे : अमली पदार्थमुक्त भारत घडविण्याच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी वराळे येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ड्रग फ्री इंडिया’ (नशामुक्त भारत) अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील’ यांच्या माध्यमातून करण्यात आले. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाकडून निमंत्रण देण्यात आले होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. सौ. सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनशैली आणि युवकांची सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा – ‘विकसित भारत २०४७’साठी ग्रामीण उद्योगांना नवी भरारी; खादी-ग्रामोद्योगाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करा

तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, तसेच नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मोलाचे ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माळी यांनी महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानले. अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अल्पना अडसूळ, AI&DS आणि AI&DS आणि AI&ML विभागप्रमुख डॉ. दिपोनिथा मंडल (Diponitha Mondal), B.Tech प्रथम वर्ष समन्वयक प्रा. योगेश नागवेकर तसेच कार्यक्रमाचे संयोजक प्रा. शरद जाधव उपस्थित होते.
या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे हा जनजागृतीपर उपक्रम विशेष महत्त्वपूर्ण ठरला.




