Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ

आधुनिक तंत्रज्ञानाच्या गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाने सज्ज व्हावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सक्षम युवा पिढी घडविण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पिंपरी | आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक उपक्रम आणि वेगवान तपासाच्या माध्यमातून गुन्हे नियंत्रणात पिंपरी चिंचवड पोलीस दलाने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात पिंपरी चिंचवडचा विस्तार पुण्यापेक्षा अधिक होणार असल्याने पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावीपणे गुन्हे नियंत्रण करीत या आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. युवाशक्तीला दिशा आणि शक्ती देण्यासाठी घर, परिसर, गाव, जिल्हा आणि महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ व लोकार्पण आज करण्यात आले. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात अंमली पदार्थाचे मोठे आव्हान आहे. युवा पिढीची क्षमता कमी करण्यासाठी आणि परिणामत: देशाची प्रगती रोखण्यासाठी देशात अंमली पदार्थ पाठविले जातात. याला पूर्णत: प्रतिबंध घालण्यासाठी पुढील 3 ते 4 वर्षात देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला असून त्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करायचे आहे. देशाच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असलेल्या, नवोपक्रमात पुढे असलेल्या युवा पिढीला अंमली पदार्थांपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाला या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घ्यावा लागेल.

राज्य शासन विविध पातळ्यांवर या दिशेने काम करीत आहे व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार, लोकजागृती, अंमली पदार्थांच्या निर्मितीवर नियंत्रण आणणे, वितरण साखळी मोडीत काढणे अशा विविध जबाबदाऱ्या संबंधित यंत्रणांवर सोपविण्यात आल्या आहेत. पालकांनीदेखील व्यसनाधीन पाल्याचे समुपदेशन करण्यासोबत त्यावर योग्य उपचार वेळीच करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पोलिसांना अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर

मुख्यमंत्री म्हणाले, पिंपरी चिंचवडसाठी अत्यंत आधुनिक असे पोलीस मुख्यालय तयार करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीची रचना दिवंगत अजित पवार यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतली आहे. आयुक्तालयाची इमारत तयार झाल्यावर ते देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पोलीस मुख्यालयासाठी देखील 50 एकर जागा देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांसाठी आधुनिक स्वरुपाची निवासस्थाने उभारण्यात येत आहेत. पोलिसांसाठीच्या निवासस्थानाचा पारंपरिक आराखडा बदलून सर्व सोईयुक्त निवासस्थाने पोलिसांना देण्यात येत आहेत. पोलीस कुटुंबांना सन्मानाने जगता यावे यासाठी चांगल्या घरांची निर्मिती तयार करण्यात येत आहे, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक

शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे आहे. डायल 112 मुळे प्रतिसादाची वेळ 3 मिनीटावर आली आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय याबाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गुन्हे घडताना तात्काळ प्रतिसाद देऊन पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. याची डिजीटल माहिती उपलब्ध होत आहे. गुन्हेगारांवर यामुळे वचक बसतांना दिसत आहे. रस्त्यावरील गुन्हे पूर्णत:नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढते आहे. सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून वाहतूक, गुन्हे नियंत्रणाचे काम शक्य होत आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे मानवी मर्यादांवर मात करून गुन्ह्यांचा तपास करता येतो. एआय आधारित ‘तपास सारथी’मुळे तपास सुरू झाल्यापासून न्यायालयात जाईपर्यंत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे तपास व आरोपपत्र तयार करण्याचे काम होत आहे. यामुळे गुन्हे नियंत्रणात निश्चितपणे उपयोग होणार आहे.

पोलीस दलदेखील नवे तंत्रज्ञान आत्मसात करताना दिसत आहेत. बॉडीवॉर्न कॅमेऱ्यामुळे कमांड ॲण्ड कन्ट्रोल सिस्टीमलादेखील गुन्हे तपासाची माहिती मिळण्यासोबत पोलीसांना सुरक्षितता मिळणार आहे. वाहतूकीच्या तक्रारीदेखील यामुळे येत्या काळात कमी होतील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अत्यंत कमी कालावधीत चांगली प्रगती केल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. पुढील 15 वर्षात पिंपरी चिंचवड परिसरात पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणार असल्याने पोलीस दलाने त्यादृष्टीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना चांगल्या सुविधा असणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा गुन्हे नियंत्रणासाठी तसेच वाहतूक नियमनासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री.शिंदे यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना हक्काची घरे व आवश्यक सुविधा देण्यासाठी शासनाचे विविध माध्यमातून प्रयत्न होत असून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

कर्मचारी महासंघाच्या करारामुळे हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड..!

उद्याचे भविष्य असलेल्या तरुणाला अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलाने यासाठी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना शहराच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांना हक्काचे घर आणि शहराला सुरक्षेचे कवच मिळवून देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाचे उपक्रम महत्वाचे आहेत. पिंपरी चिंचवड हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यालय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी राज्य शासन समर्थपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एक कोटीची मदत केली, ही पोलिसांची संवेदनशीलता आहे, अशा शब्दात त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. राज्य शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूतीने उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहराने काही वर्षातच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात दिवंगत अजित पवार यांचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या आणि पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आलेल्या विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षित भविष्याचा मजबूत पाया रचला जात आहे. स्व.अजित पवार यांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १८० कोटी रुपये मंजूर केले होते. त्या माध्यमातून स्वतंत्र आणि आधुनिक पोलीस मुख्यालयाच्या दिशेने वाटचाल होत आहे.

पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथील जमिनीच्या सातबाऱ्याचे हस्तांतरण आज करण्यात आले. पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील सक्षम यंत्रणेसाठी हे ऐतिहासिक पाऊल आहे. पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पोलीस दलासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिखलीमध्ये पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत, पिंपरी पोलीस संकुल, आळंदी येथे पोलीस स्थानकाची नवी इमारत, वाकड येथे अपर पोलीस आयुक्त कार्यालय, अंमली पदार्थाविरुद्ध टास्क फोर्सचे मुख्यालय, वाहतूक कार्यालय, सायबर कार्यालय आदींमुळे पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयाला पायाभूत सुविधा मिळणार आहेत.

आजच्या काळात गुन्हेगारीचे स्वरुप बदलत आहे, शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे पोलीस दलाने आधुनिक होणे गरजेचे आहे. त्यामुळे आयटीएमएसमुळे वाहतुकीचे नियमन अधिक सुरळीतपणे होणार आहे. ज्येष्ठानुबंध या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना पोलीस दलाच्या माध्यमातून आधार आणि विश्वास मिळेल. दिशासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा देण्याचे कार्य होत आहे. क्रीडा विभागाच्या माध्यमातून अशा उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अंमलीपदार्थाविरुद्धच्या मोहिमेबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे अभिनंदन केले.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त चौबे यांनी आयुक्तालयाचे उपक्रम, नागरिक, उद्योग आदींच्या सुरक्षेबाबतची कामगिरी, आयुक्तालयासाठी वाहने, आधुनिक तंत्रज्ञान आदींसह विविध साधन सुविधांची उपलब्धता, आयुक्तालयाची यशस्वी कामगिरी आदींबाबत माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी दुष्काळ ग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगाराचा 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. पोलीस आयुक्तालयाच्या दिशा उपक्रमात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार उमा खापरे, विक्रम काकडे, शंकर जगताप, सुनील शेळके, सुनील कांबळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आदींसह लोकप्रतिनिधी, पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी, दिशा उपक्रमातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथे मंजूर झालेल्या जागेच्या 7/12 उताऱ्याचे औपचारिक हस्तांतरण आणि सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्तालयाच्या सीसीटीव्ही व एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी पोलीस ठाणे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 कार्यालय, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विभागीय कार्यालय व 200 शासकीय निवासस्थाने यांचा समावेश असलेले पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन आणि पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 350 बॉडी-वॉर्न कॅमेरे, 4 ड्रोन व 65 नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पणही श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नशामुक्त पिंपरी चिंचवड अभियानाचा शुभारंभदेखील यावेळी करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group