सांगली जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री; संजयकाका पाटील एका मताने विजयी!
सुमनताई पाटील यांचा पराभव; कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे, मिरजेत अण्णासाहेब कोरे विजयी

सांगली । प्रतिनिधी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत चुरशीच्या लढतींचे निकाल समोर आले आहेत. जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत प्रवेश केला. तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. कवठेमहांकाळमधून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, तर मिरजेतून अण्णासाहेब कोरे विजयी झाले आहेत.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तासगाव सोसायटी गटात अखेरच्या मतापर्यंत उत्कंठा कायम होती. संजयकाका पाटील यांना ३९, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. अवघ्या एका मताने झालेला हा पराभव सुमनताई पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्या गटासाठी धक्का मानला जात आहे.
हेही वाचा
किल्ले रायगडावरील रोपवे सेवा ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू; दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण
जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांनी प्रतिस्पर्धी विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. पडळकर यांना ५४, तर पवार यांना ३४ मते मिळाली. उमेदवारीवरून न्यायालयीन संघर्ष झाल्यानंतर मिळालेल्या या विजयामुळे पडळकर यांच्या जिल्हा बँकेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कवठेमहांकाळ सोसायटी गटात अजितराव घोरपडे यांनी प्रतिस्पर्धी तानाजी पाटील यांच्यावर विजय मिळवला. मिरज सोसायटी गटातून अण्णासाहेब कोरे यांनी अनिल शेगुणशे यांचा पराभव केला. निकालानंतर मिरज येथील शेतकरी भवन परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला.
बँकेच्या एकूण २१ संचालकपदांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी मतदान झाले होते. उपलब्ध वृत्तांनुसार चार तालुका सोसायटी गटांचे निकाल समोर आले असून, उर्वरित दोन जागांच्या निकालाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.




