‘अर्णब’नंतर ‘मुरासू’ वादळाने किनारपट्टी झोडपली; महाराष्ट्रातही हवामान बदलले

Cyclone Murasu Landfall | ‘अर्णब’ चक्रीवादळानंतर आता ‘मुरासू’ या तीव्र चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. मध्यरात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास हे चक्रीवादळ ओंगोलजवळील कोथपट्टणम येथे धडकले (Landfall). या वेळी तब्बल १५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मोठी पडझड झाली आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवत असून राज्यातील काही भागांत तापमानात वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
चक्रीवादळाच्या तीव्र माऱ्यामुळे नेल्लोर, प्रकाशम आणि बापटला जिल्ह्यांत शेकडो झाडे उन्मळून पडली असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सुदैवाने, या वादळात विजेचे खांब टिकून राहिल्याने बाधित भागातील वीजपुरवठ्यावर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पहाटे ३.३० वाजताच जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी टेलिकॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा
फिडेल सॉफ्टटेक ने केली सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
मागील ‘अर्णब’ चक्रीवादळात वीजवाहिन्या तुटून लागलेल्या शॉकमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यांवरील झाडे आणि अडथळे पूर्णपणे दूर होईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री नायडू यांनी प्रशासनाला दिले आहेत. विद्युत विभागानेही वीज यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवले आहे.
पुढील १२ तास धोक्याचे; समुद्र खवळलेला, उंच लाटा उसळणार
हवामान खात्याने पुढील १२ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. समुद्रात खगोलीय भरतीपेक्षा १ ते १.५ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून बापटला, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांतील किनारपट्टीच्या सखल भागात पाणी शिरण्याचा धोका आहे. या वादळाचा प्रभाव उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीवरही झाला असून, पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.




