TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

शरद पवार रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; पुढील दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल; काही वैद्यकीय चाचण्या सुरू असल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सततच्या दौऱ्यांमुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील दोन दिवस रुग्णालयातच विश्रांती

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्येच विश्रांती घेणार आहेत. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. सर्व चाचण्यांचे अहवाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा –  शिवसेना-भाजप युती अभेद्य; मतभेद चर्चेतून सोडवू, युती तुटणार नाही : राज्यमंत्री योगेश कदम

सुप्रिया सुळे यांनी दिली प्रकृतीबाबत माहिती

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली. “बाबांना रुबी हॉलमध्ये दाखल केले आहे. काही चाचण्या केल्या जात आहेत. याबाबतची माहिती मी तुम्हा सर्वांना देत राहीन,” असे त्यांनी सांगितले.

अलीकडेच केला होता सोलापूर जिल्ह्याचा दौरा

दरम्यान, शरद पवार यांनी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती.

तुळशी गावात त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडल्या. या समस्या सरकारदरबारी मांडण्याचे आश्वासनही शरद पवार यांनी दिले होते.

सततच्या दौऱ्यांनंतर शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय तपासणीनंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group