TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक; ३ नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन

साखर कारखानदार आणि सरकारच्या भूमिकेचा निषेध; शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील गावभेटींना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ऊस दराच्या प्रश्नाकडे साखर कारखानदार व सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निषेधार्थ ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राजू शेट्टी यांनी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील अनेक गावांचा दौरा केला. दत्तवाड, अब्दुललाट, आकिवाट, शिरटी, बुबनाळ, नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, नरंदे, आळते आणि रुई या गावांमध्ये त्यांनी गावभेटी आणि कोपरा सभा घेतल्या. या सभांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. शेतकऱ्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.

साखरेचे दर वाढले, मग ऊसाला वाढीव दर का नाही?

राजू शेट्टी यांनी सरकार आणि साखर कारखानदारांच्या धोरणांवर टीका केली. सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. तसेच बगॅस आणि मोलॅसिस या उपपदार्थांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साखर कारखान्यांना सर्व बाजूंनी नफा होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर देण्यास कारखानदार नकार का देत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

साखर कारखानदार आणि सरकारने संगनमत करून शेतकऱ्यांना कोंडीत पकडल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. राज्यातील शेतकरी एका बाजूला महागाई आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत आहे. शेतीचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  Weather Alert : २१ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

‘हक्काच्या ऊसदराचा जाब विचारलाच पाहिजे’

शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या घामाचा आणि उसाच्या वाजवी दराचा जाब कारखानदारांना विचारला पाहिजे. शेतकरी शांत बसले, तर त्यांची पिळवणूक अशीच सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

३ नोव्हेंबरपासून किणी टोल नाक्यावर आंदोलन

३ नोव्हेंबर रोजी होणारे आंदोलन केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून ते बेमुदत असेल, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ‘आरपारची लढाई’ असल्याचे त्यांनी म्हटले.

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील प्रत्येक घरातील शेतकऱ्याने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता किणी टोल नाक्यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे. ऊसदर आणि प्रलंबित मागण्यांवर तोडगा निघावा, यासाठी आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button