Weather Alert : २१ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक राज्यांत वादळी पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात ५ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा नाही, मुंबई-ठाणे-पालघरमध्ये हवामान निरभ्र राहण्याची शक्यता.

IMD Rain Alert : मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही नैसर्गिक आपत्तींचे संकट कायम असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उद्या २ नोव्हेंबर रोजी देशातील २१ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या हवामान बदलाचा परिणाम शेतीसह जनजीवनावर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान प्रणालीमुळे चारपेक्षा अधिक राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या आसपास पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव तीव्र होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि आसपासच्या परिसरात वरच्या वातावरणात चक्रीवादळी स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – दिवाळीच्या फराळात भेसळ आढळल्यास FDA पोर्टलवर तक्रार करा; तुकाराम मुंढेंचा व्यावसायिकांना कडक इशारा
२१ राज्यांना पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या काळात काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो. ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे उन्मळून पडण्याची आणि शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ५ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा नाही
महाराष्ट्रातील हवामानाबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढील काही दिवस हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो.
राज्यातील काही भागांत आकाश निरभ्र राहण्याची, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असताना महाराष्ट्रातील हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे. तरीही स्थानिक हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.




