राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महागोदा आरती; पर्यावरणपूरक सिंहस्थाचा संकल्प
श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश; कुंभगीत, संकेतस्थळाचे उद्घाटन आणि विशेष टपाल तिकिटांचे विमोचन

नाशिक : हजारो वर्षांची धार्मिक परंपरा, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी आणि भगवान शंकराच्या सान्निध्याने पुनीत झालेले त्र्यंबकेश्वर अशा पवित्र वातावरणात नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश घुमला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन न राहता पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि आधुनिकतेची जोड देणारे आदर्श पर्व ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदाघाटावर आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रपतींसह उपस्थित मान्यवरांनी गोदापूजन केले. ‘पवित्र नाशिक नगरीला माझा नमस्कार’ या मराठी शब्दांत भाषणाची सुरुवात करून राष्ट्रपतींनी उपस्थितांची मने जिंकली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येण्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मंत्री जयकुमार रावल, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, मंत्री नितेश राणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, विविध आखाड्यांचे साधू-महंत, जगद्गुरू आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव
‘महाराष्ट्राची भूमी ही अमृतभूमी आहे. या पावन भूमीला मी कोटी कोटी प्रणाम करते,’ अशा शब्दांत राष्ट्रपतींनी महाराष्ट्राविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने कृतार्थ झाल्याचे सांगताना त्यांनी भगवान शंकराचे पावन सान्निध्य लाभलेली त्र्यंबकेश्वरची भूमी, प्रभू श्रीरामांच्या वनवासाच्या स्मृती जपणारी नाशिकची तपोभूमी आणि सर्वांना आशीर्वाद देणारी गोदावरी नदी यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले.
भारतात धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यांची प्राचीन परंपरा असून सुमारे १,४०० वर्षांपूर्वीही लोक मोठ्या श्रद्धेने अशा आयोजनांमध्ये सहभागी होत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. काळ आणि पिढ्या बदलल्या, तरी भारतीयांच्या मनातील श्रद्धेचा प्रवाह अखंड राहिला आहे. कुंभपर्व हे केवळ आस्थेचे प्रतीक नसून सामाजिक एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारे पर्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान, अभिनव भारतची क्रांतिकारी परंपरा, गोदावरीचे उगमस्थान तसेच चाफेकर बंधू आणि दादासाहेब पोतनीस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्राने देशाला सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाची दिशा दिल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांचा सहभाग; पर्यावरण रक्षणाचे आवाहन
नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यांमधील ६५० गावांतील सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधव या सोहळ्यात सहभागी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. हा सहभाग भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत वेगाने प्रगती करत असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा संवेदनशीलतेने उल्लेख करताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपत केंद्र व राज्य सरकार त्यांना आवश्यक मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याबरोबरच स्वच्छता आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले. श्रद्धेसोबत पर्यावरणाविषयीची जबाबदारीही प्रत्येकाने जपावी, असा संदेश देत त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२७ साठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – पेन्शनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला सादर करता येणार; ‘जीवन प्रमाण’ ॲपची सुविधा
स्वच्छ आणि पर्यावरणपूरक कुंभमेळ्याचा राज्यपालांचा विश्वास
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले. सिंहस्थ कुंभमेळा हा जात-पात, धर्म किंवा सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांना अध्यात्माच्या धाग्याने जोडणारा श्रद्धेचा महासंगम असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ऐतिहासिक आणि भव्य आयोजन महाराष्ट्र शासन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी गोदावरीच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना ‘गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होवो, बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो आणि महाराष्ट्राची भूमी पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् होवो,’ अशी प्रार्थना राज्यपालांनी केली.
नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभपर्वाला सनातन संस्कृतीच्या विविध अभिव्यक्ती आणि आविष्कारांचा महासंगम असे संबोधले. गंगा-गोदावरीच्या पवित्र स्नानाची परंपरा जपणारा कुंभमेळा हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगभरातील भाविकांच्या आस्थेचा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
गोदावरीच्या महागोदा आरतीसाठी ६ हजार ५०० आदिवासी बांधव सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सनातन संस्कृतीच्या जतनात आदिवासी जनजातींचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य, दिव्य आणि सुंदर करण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील विकासकामे प्रत्यक्षात साकारत असल्याचे सांगत शासनाची भूमिका सुविधा निर्माण करण्याची आहे, तर या कुंभपर्वाचे खरे मालक साधू-महंत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. शासन-प्रशासनाकडून काही चूक झाल्यास संत-महंतांनी मोठ्या मनाने क्षमा करावी, असेही त्यांनी नमूद केले. ऐतिहासिक सोहळ्यासाठी नाशिककरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आणि राष्ट्रपतींचेही धन्यवाद व्यक्त केले.
१२ कोटी भाविकांच्या स्वागतासाठी शासन सज्ज : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी सिंहस्थासाठी जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता या परिसराच्या भविष्याला नवी दिशा देतील, असे ते म्हणाले.
संत-महंत आणि भाविकांसोबतच सामान्य कष्टकऱ्यांच्या हाताला काम देणारा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा हा आर्थिक महोत्सवही ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, नारीशक्तीच्या सन्मानाचा आणि सामाजिक एकात्मतेचा जागतिक आविष्कार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या रामतीर्थावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहण होणे हा ऐतिहासिक सुवर्णक्षण असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचे मूर्त स्वरूप या कुंभपर्वातून जगाला पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुंभगीत, संकेतस्थळाचे उद्घाटन; विशेष टपाल तिकिटांचे विमोचन
या सोहळ्यास आमदार सुहास कांदे, गोकुळ गिते, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या कुंभगीत आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचन करण्यात आले. ही विशेष टपाल तिकिटे रामचंद्र जायभावे यांनी राष्ट्रपतींना सुपूर्द केली. या उपक्रमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यात आली.




