दिवाळीच्या फराळात भेसळ आढळल्यास FDA पोर्टलवर तक्रार करा; तुकाराम मुंढेंचा व्यावसायिकांना कडक इशारा
लाडू-चिवडा विक्रीच्या उद्घाटनापूर्वी FDA कडून गुणवत्ता तपासणी; दिवाळीनिमित्त चार टप्प्यांत विशेष मोहीम, नियमांचे पालन करण्याचे व्यावसायिकांना आवाहन.

Pune : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि फराळाच्या पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) सज्ज झाले आहे. पुण्यातील द पूना मर्चंट्स चेंबरच्या लाडू-चिवडा विक्रीचे उद्घाटन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भेसळखोरांना कडक इशारा दिला. दिवाळीच्या फराळात भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी तातडीने FDA च्या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुंढे यांनी सांगितले की, लाडू-चिवडा विक्रीचे उद्घाटन करण्यापूर्वी FDA कडून गुणवत्ता तपासणी करण्यात आली होती. गुणवत्तेशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चार टप्प्यांत FDA ची विशेष मोहीम
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA कडून सणाच्या २१ दिवस आधीपासून ते सणानंतर ३० दिवसांपर्यंत चार टप्प्यांत विशेष मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात उत्पादक (Manufacturers), गोदामे (Warehouses), डीलर्स आणि सेमी डीलर्स यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. असुरक्षित किंवा निकृष्ट दर्जाचा कच्चा माल बाजारात येऊ नये, हा या टप्प्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यात किरकोळ विक्रीच्या ठिकाणी लाडू आणि दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांची तपासणी केली जात आहे. सणाच्या आठ ते पंधरा दिवस आधीच फराळ तयार केला जात असल्याने या काळात तपासणी आणि कारवाई सुरू करण्यात आल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Rahul Gandhi : ‘ज्ञानेश कुमारांना पदावरून हटवावेच लागेल’; रामलीला मैदानातील महारॅलीतून मोदी-शाहांनाही इशारा
ड्रायफ्रूट्स, मिठाई, दूधजन्य पदार्थांवरही नजर
दिवाळीच्या काळात ड्रायफ्रूट्स, मिठाईची दुकाने, दूधजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि मसाले यांचीही सातत्याने तपासणी केली जात आहे. सणानिमित्त तयार होणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर FDA लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
खाद्यपदार्थ तयार करताना कृत्रिम रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संशय आल्यास FDA पोर्टलवर तक्रार करा
दिवाळीच्या फराळात किंवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी FDA पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिक समुदायाला सुरक्षेसंबंधीचे नियम आणि बंधने पाळण्याचे आवाहन करताना त्यांनी FDA कडून सण आणि अन्नपदार्थांच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमांचे व अनुपालन आदेशांचे (Compliance Orders) काटेकोर पालन करण्यास सांगितले.
सुरक्षेचे नियम पाळल्यास व्यावसायिकांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल आणि नागरिकांना अन्नपदार्थांमुळे आजार होण्याचा धोका टाळण्यास मदत होईल, असेही मुंढे यांनी सांगितले.




