TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Rahul Gandhi : ‘ज्ञानेश कुमारांना पदावरून हटवावेच लागेल’; रामलीला मैदानातील महारॅलीतून मोदी-शाहांनाही इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन; राहुल गांधींचा गंभीर आरोप, ‘राजीनाम्यानंतर मोर्चा मोदींकडे वळणार’.

India Alliance Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी आज दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते सहभागी झाले होते.

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल

रामलीला मैदानावरील महारॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी लढा देत असल्याचे त्यांनी म्हटले.

‘लोकांच्या यंत्रणा हायजॅक करण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही देशातील लोकशाही संपवू देणार नाही आणि संविधानही संपवू देणार नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले. मतचोरी हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवावेच लागेल, अशी मागणी त्यांनी केली.

‘ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते,’ असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. देशातील १५ टक्के मतदारांना मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा दावा करत २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा –  शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये कधी जमा होणार? एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती

साडेतेरा कोटी मतदारांचा उल्लेख; शेतकरी कर्जावरूनही टीका

रॅलीतील भाषणात राहुल गांधी यांनी २०२४ नंतर साडेतेरा कोटी मतदारांची नावे मतदान यादीतून काढण्यात आल्याचा आरोप केला. तसेच मोठ्या उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली जातात; मात्र शेतकरी कर्ज फेडू शकला नाही, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, अशी टीका त्यांनी केली.

ही महारॅली देशातील जनतेचा आवाज असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीचा लढा लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे म्हटले.

‘ज्ञानेश कुमारांनंतर मोर्चा मोदींकडे वळणार’

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. ‘ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर मोर्चा मोदींकडे वळणार आहे,’ असे विधान त्यांनी केले.

‘तुम्ही विसरू नका, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही,’ असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यामुळे रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या महारॅलीतून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button