TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनवर FDA चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी ७५ हजारांचा दंड

नागपाडा मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आठवडाभरात तपासणी

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील अस्वच्छतेप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. कॅन्टीनमधील स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी चालकाला ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर FDA ची कारवाई

मुंबई पोलीस दलातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून नागपाडा येथील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा आणि अस्वच्छतेबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करत होते. मात्र, या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली.

तक्रारीनंतर FDA ने आठवडाभरात कॅन्टीनची तपासणी करून कारवाई केली. या कारवाईत कॅन्टीन चालकाला ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिवाळीत भेसळखोरांविरोधातील मोहीम सुरूच राहणार

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दिवाळीच्या काळात भेसळखोरांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खाद्यपदार्थ तयार करताना योग्य दर्जाच्या तेलाचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगत खाद्यतेलातील भेसळीविरोधात प्रशासनाची मोहीम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या आतापर्यंत १,०८९ तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ८० परवाने रद्द करण्यात आले असून, २८,७५३ क्विंटल माल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कालबाह्य अन्नपदार्थ विक्रीसाठी बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता प्रत्येक व्यावसायिकाने घ्यावी. कंपनी लहान असो किंवा मोठी, नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा –  नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज धर्मध्वजारोहणाने शुभारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रमुख उपस्थिती

अन्न व्यवसायासाठी २२ नियमांच्या कम्प्लायन्स ऑर्डर

केवळ कारवाई करणे हे FDA चे उद्दिष्ट नसून अन्न व्यवसायातील नियमांचे पालन सुनिश्चित करणे महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. हॉटेल, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शालेय खाद्यपदार्थ आणि इतर अन्न व्यवसायांसाठी नियम स्पष्ट करणाऱ्या २२ कम्प्लायन्स ऑर्डर जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या आदेशांमध्ये अन्न व्यवसायिक, परवानाधारक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

कालबाह्य आणि खराब अन्न नष्ट केल्याचा पुरावा द्यावा लागणार

पत्रकार परिषदेत मुंढे यांनी ‘एक्स्पायर, रिटर्न अँड डॅमेज फूड’ संदर्भातील नव्या आदेशाचीही माहिती दिली. कालबाह्य किंवा खराब झालेले अन्नपदार्थ पुन्हा वापरात आणले जाण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी हा आदेश महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कालबाह्य, परत आलेले किंवा खराब झालेले अन्न पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचा पुरावा संबंधित कंपनीला द्यावा लागणार आहे. अन्नपदार्थांचा सुरक्षित वापर आणि ग्राहकांचे आरोग्य यांना प्राधान्य देऊन प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button