सिल्लोड, सोयगावच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश
सिल्लोडच्या १०७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची ८८.८३ टक्के कामे पूर्ण; अजिंठा लेणी परिसरातील पाणीपुरवठा प्रश्न सोडविण्यावर भर

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने आणि वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करून स्थानिक अडचणी दूर करण्याच्या सूचना केल्या.
जल जीवन मिशनअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांसाठी मंजूर ग्रीड पाणीपुरवठा योजनेची भौतिक प्रगती ८८.८३ टक्के झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण हा या योजनेचा जलस्रोत आहे. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय साधून कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
सोयगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.
हेही वाचा – ३८ चेंडू, ११ षटकार अन् ११३ धावा! अभिषेक शर्माने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम
दरम्यान, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर (अजिंठा लेणी) सुधारात्मक पाणीपुरवठा योजनेचाही आढावा घेण्यात आला. या योजनेतील जलवाहिन्या बदलणे, जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती व नूतनीकरण तसेच पंपिंग यंत्रणांशी संबंधित कामे पूर्ण झाली आहेत. अजिंठा लेणी हे जागतिक वारसास्थळ असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया, जल जीवन मिशनच्या अतिरिक्त सह अभियान संचालक दीपाली देशपांडे-सावेडकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




