पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव; ‘शून्य जागां’च्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पीछेहाटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ‘बॅलेट पेपर’च्या मागणीवर जोरदार टोला लगावला होता. मात्र, काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या नागपूर आणि थेट पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील पराभवाची आठवण करून देत पलटवार केला आहे.
चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी मतपत्रिकांच्या (बॅलेट पेपर) माध्यमातून मतदान झाले होते. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेसला खातेही उघडता न आल्याने पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसला डिवचले. “उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांत विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या होत्या. अंदाज लावा, यात काँग्रेसने किती जागा जिंकल्या?”, असा उपरोधिक सवाल करत त्यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य केले.
काँग्रेसचा पलटवार; नागपूर आणि वाराणसीचा दाखला
पंतप्रधानांच्या टीकेला काँग्रेसने तितक्याच तीव्रतेने उत्तर दिले असून, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी वाराणसीतील निकालांचा संदर्भ देत सांगितले की, “पंतप्रधान आज बॅलेट पेपरवर बोलत आहेत; पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात (वाराणसी) जेव्हा मतपत्रिकेवर मतदान झाले, तेव्हा त्यांचा पराभव कसा झाला, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. आगामी काळात त्यांनी वाराणसीत जाण्याची चूक करू नये, अन्यथा पराभव अटळ आहे.” तर दुसरीकडे काँग्रेस माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी आव्हान देत म्हटले की, “जर पंतप्रधानांना मतपत्रिकेवर इतकाच विश्वास वाटत असेल, तर त्यांनी आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याचे विरोधकांचे आव्हान मान्य करावे.”
हेही वाचा
शासकीय योजनांच्या सर्वेक्षणातून गुणात्मक परिवर्तन घडवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरात काँग्रेसची बाजी, वाराणसीत ‘सपा’ विजयी
या निवडणुकीत भाजपालाही महत्त्वाच्या जागांवर मोठा धक्का बसला असून, संघाचे मुख्यालय आणि देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा ३,२७१ मतांनी पराभव केला (वंजारी यांना ६७,२३१ तर कोहळे यांना ६३,९६० मते मिळाली); तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघातील शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले.
काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाचा निकाल
चार राज्यांतील एकूण २८ जागांपैकी काँग्रेसने १२ जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी केवळ एकाच ठिकाणी (नागपूर) पक्षाला विजय मिळवता आला. विशेषतः कर्नाटकात स्वतःची सत्ता असतानाही तेथील चारही जागांवर भाजपा-जेडीएस युतीने विजय मिळवल्यामुळे हा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे.




