चिंचवडमध्ये कुणाल मार्केटच्या पार्किंगला मध्यरात्री भीषण आग; २१ वाहने जळून खाक, १० जणांची सुखरूप सुटका

पिंपरी-चिंचवड | चिंचवड गावातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत १७ दुचाकी आणि ४ चारचाकी अशा एकूण २१ वाहनांचा जळून कोळसा झाला. या दुर्घटनेत एका इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या १० नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप सुटका केली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, वाहने पूर्णपणे खाक झाल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल मार्केटच्या पार्किंग परिसरात मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आपल्या कवेत घेतले. यामध्ये १७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचा धूर आणि ज्वाला वेगाने वर पसरल्याने इमारतीच्या टेरेसवर १० नागरिक अडकून पडले होते.
हेही वाचा
चिंचवडच्या कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १७ दुचाकी, ४ चारचाकी जळून खाक
#KunalMarket #Chinchwad #PimpriChinchwad #FireIncident #MajorFire #VehicleFire #FireBrigade #MaharashtraNews #PuneNews #BreakingNews #ChinchwadNews https://t.co/7MJntQUNZp
— Mahaenews (@mahae_news) October 29, 2026
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी एका बाजूने आगीवर पाण्याचा मारा करत नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले, तर दुसऱ्या बाजूने टेरेसवर अडकलेल्या सर्व १० नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जवानांच्या वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे समोर आले आहे.
आगीचे कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
आग कशामुळे लागली शॉर्ट सर्किटमुळे की अन्य काही कारणाने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत वाहनमालकांचे अतोनात नुकसान झाले असून, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू आहे.




