भाजपा मंत्र्याने मागितली गायक दलेर मेहंदींची माफी; जाणून घ्या संपूर्ण वाद..

Daler Mehndi | उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे आयोजित कुंजापुरी देवी मेळ्यादरम्यान प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांच्याशी रंगमंचावर गैरवर्तन केल्याप्रकरणी अखेर भाजप सरकारमधील मंत्री सुबोध उनियाल यांनी माघार घेतली आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंह आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मंत्री सुबोध उनियाल यांनी थेट दलेर मेहंदी यांना फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी (माफी) व्यक्त केली आहे. मिका सिंहच्या टीमने प्रसिद्धीपत्रक काढून या वादावर आता पडदा पडल्याची माहिती दिली.
१८ ऑक्टोबर रोजी टिहरी गढवालमध्ये दलेर मेहंदी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल थेट स्टेजवर चढले आणि दलेर मेहंदी यांनी मद्यपान केले असल्याचा आरोप करत त्यांचा चालू कार्यक्रम रोखला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि राजकीय व कला क्षेत्रात संतापाची लाट उसळली.
हेही वाचा
भीमाशंकर अभयारण्यात कोणतीही अवैध वृक्षतोड नाही; वनविभागाचा मोठा खुलासा
व्हिडिओ समोर आल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, हास्यकलाकार कपिल शर्मा आणि राजपाल यादव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दलेर मेहंदी यांची पाठराखण केली. दलेर मेहंदी पूर्णपणे निर्व्यसनी असून ते सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी लढा देत असल्याचे कलाकारांनी स्पष्ट केले. दलेर यांचे धाकटे बंधू मिका सिंह यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहीत मंत्री उनियाल यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली. “मंत्र्याची ही वागणूक उद्धट, बेजबाबदार आणि ज्येष्ठ कलाकाराचा अपमान करणारी आहे,” असे म्हणत मिकाने आरोप सिद्ध करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. तसेच ‘अशा वागणुकीमुळे भविष्यात कलाकार उत्तराखंडमध्ये येणे बंद करतील’, असा इशारा देत उनियाल यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली होती.
मंत्र्यांकडून माफी; मिकाच्या टीमकडून वादाला पूर्णविराम
वाढता वाद आणि चौफेर टीकेनंतर मंत्री सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यानंतर मिकाच्या टीमने प्रसिद्धीपत्रक जारी केले. “दलेरजी हे संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तिमत्त्व आहेत. प्रत्येक कलाकाराचा मान राखला जाणे आवश्यक आहे. मंत्र्यांनी फोनवरून माफी मागितल्यामुळे आता हा वाद मागे सोडून सर्वजण परस्पर आदर आणि सामंजस्याने पुढे जातील, अशी आशा आहे,” असे नमूद करत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहे.




