‘कडक कपडे घालून इम्प्रेशन मारतात, पण ओनरशिप नसते’; नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना टोला
‘महादेवाच्या मंदिरात दूध अर्पण करण्याऐवजी पाणी टाकतील’; अॅग्रो व्हिजन कार्यक्रमातील विधानाची चर्चा

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांच्या कार्यपद्धतीवर परखड भाष्य करत त्यांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. काही नेते केवळ दिखावा करतात, कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात; मात्र प्रत्यक्ष कामाची जबाबदारी स्वीकारत नाहीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. नागपुरात आयोजित अॅग्रो व्हिजन कार्यक्रमातील त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होत आहे.
नागपुरात दरवर्षी नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने अॅग्रो व्हिजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि आधुनिक उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. याच कार्यक्रमात गडकरी यांनी राजकीय नेत्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर भाष्य केले.
‘नेत्यांमध्ये चतुराई असते; मात्र ओनरशिप नसते’
गडकरी म्हणाले की, राजकारणात अनेक हुशार नेते असतात. ते बोटाने मलम लावल्यासारखे काम करतात. कडक कपडे घालून कार्यक्रमाच्या मंचावर येतात आणि आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ते निघून जातात. असे चतुर लोक राजकारणात अनेक आहेत. त्यांची चतुराई दिसून येते; पण त्यांच्यात कामाची जबाबदारी स्वीकारण्याची भावना म्हणजेच ‘ओनरशिप’ नसते. राजकारणात अशा गोष्टी चालून जातात, अशा शब्दांत त्यांनी नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
हेही वाचा – प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपा; ‘जनरेशन वॉव’ला ज्ञानासोबत नैतिकतेचे भान आवश्यक : मुख्यमंत्री फडणवीस
महादेवाच्या मंदिरातील उदाहरण देत साधला निशाणा
राजकीय नेत्यांच्या मानसिकतेवर भाष्य करताना गडकरी यांनी महादेवाच्या मंदिरातील दूध अर्पण करण्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, पाऊस पडावा यासाठी महादेवाच्या मंदिरात सर्वांनी दूध अर्पण करावे, असे सांगितले तर राजकारणातील काही लोक दुधाऐवजी पाणी टाकतील. कारण गावातील इतर सर्वजण दूध अर्पण करणार आहेत, मग आपण आपले दूध कशाला खर्च करायचे, असा विचार ते करतात.
या उदाहरणातून त्यांनी सामूहिक प्रयत्नांमध्ये स्वतःचा वाटा उचलण्याऐवजी इतरांच्या योगदानावर अवलंबून राहणाऱ्या वृत्तीवर बोट ठेवले.
केवळ दिखावा नको, ठोस काम करा!
केवळ सौम्य भूमिका घेऊन किंवा वरवरचे प्रयत्न करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कामातून परिणाम साधला पाहिजे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या गावाची आणि मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून तेथील परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
राजकीय नेत्यांनी केवळ कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठोस काम उभारावे, हा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला. त्यांच्या परखड विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.




