महिला विश्वचषक २०२८ चे यजमानपद पाकिस्तानला; टीम इंडिया दुबईत खेळणार?

Women’s T20 World Cup 2028 | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी महिला टी-२० विश्वचषक २०२८ स्पर्धेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा ७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत रंगणार असून, याचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. संपूर्ण स्पर्धा देशातच भरवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असला, तरी भारत आणि पाकिस्तानमधील ‘हायब्रिड मॉडेल’नुसार (मिश्र प्रारूप) भारतीय संघाचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत.
भारतीय महिला संघाचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) प्रामुख्याने विचार केला जात आहे. या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नसला तरी भारत-पाक दरम्यानच्या करारानुसार जेव्हा एखादा देश स्पर्धा आयोजित करतो, तेव्हा दुसऱ्या देशाचा संघ तटस्थ ठिकाणी सामने खेळतो. यापूर्वी २०२५ च्या पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही याच मॉडेलचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी भारताचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले गेले होते आणि दुबईतील अंतिम सामन्यात भारताने जेतेपद पटकावले होते; तर पाकिस्तानने उपांत्य फेरीसह उर्वरित १० सामन्यांचे आयोजन केले होते.
हेही वाचा
चिचंवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये शारदोत्सव दिमाखात साजरा; दांडियाने धरला ठेका
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान महिला विश्वचषक आयोजित करण्यास सज्ज आहे; मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच येथेही हायब्रिड मॉडेल लागू करण्याची विनंती ते आयसीसीकडे करणार आहेत. भारतीय संघ नसलेले साखळी आणि बाद फेरीतील सर्व सामने पाकिस्तानमध्येच होतील. पाकिस्तान ते दुबई प्रवास अत्यंत जलद असल्याने खर्चात बचत आणि सुलभ व्यवस्थापनासाठी युएई हेच सर्वांत योग्य तटस्थ ठिकाण ठरेल, असे पीसीबीचे मत आहे.
अंतिम सामन्याबाबत काय असेल समीकरण?
भारतीय महिला क्रिकेट संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघ बाद फेरीत (नॉकआउट) पोहोचण्याची दाट शक्यता आहे. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम सामनाही तटस्थ ठिकाणीच (युएई) खेळवला जाईल. मात्र, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, तर अंतिम सामन्याचे आयोजन लाहोरमध्ये केले जाईल. आयसीसीकडून यजमान देशाला मिळणारी ‘होस्टिंग फी’ आणि अतिरिक्त निधी पाकिस्तानला मिळणार आहे.




