Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शेतकरी कर्जमुक्तीला गती! १.१५ लाख पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६; १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत १३,२७५ कोटी रुपये जमा

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आणखी १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

१५.८५ लाख शेतकऱ्यांना १३,२७५ कोटींची कर्जमुक्ती

महाआयटीने विकसित केलेल्या योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यापूर्वी पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. आता चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची संधी देण्यात आली आहे.

बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींत यादी उपलब्ध

प्रसिद्ध करण्यात आलेली चौथी यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रात द्रुतगती मार्गांच्या उभारणीला राखेचा आधार; महानिर्मिती-MSRDC मध्ये करार

३१ मार्च २०२६ च्या थकबाकीची खातरजमा करा

या योजनेतील कर्जथकबाकीची गणना ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडून ३१ मार्च २०२६ रोजीच्या थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार ही कर्जे निरंक करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष लाभार्थ्यांसाठी एसओपी जारी

योजनेसाठी पात्र असलेल्या मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या संबंधित कर्जखात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button