मनोज जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
‘अडीच वर्षांनंतरच क्लिप का बाहेर आली?’ फडणवीसांचा सवाल; सत्य जनतेसमोर आणणार, नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाचेही आवाहन

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची पूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल आणि त्यातून सत्य समोर आणले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ही कथित क्लिप अडीच वर्षांनंतरच बाहेर येण्यामागे नेमका काय हेतू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या संभाषणाची सत्यता तपासणे आवश्यक आहे. ही क्लिप आता का समोर आली, कोणाला लक्ष्य केले जात आहे आणि त्यामागील उद्देश काय आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
सर्व बाजूंनी चौकशीची मागणी
या कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि भाजपनेही केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि फॉरेन्सिक तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
क्लिपमधील संभाषण खरे आहे की त्यात काही फेरफार करण्यात आला आहे, याबाबत तपासातून स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणातील दाव्यांची सत्यता तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा – जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे सरकारचा खरा चेहरा समोर आला; विजय वडेट्टीवारांचा आरोप
मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्व असून, मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.




