तिबेटमध्ये ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; जमिनीखाली १० किमी खोलीवर केंद्रबिंदू

Tibet Earthquake | उत्तर तिबेटच्या भागाला गुरुवारी (२२ ऑक्टोबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास भूकंपाचे अत्यंत जोरदार धक्के बसले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) आणि चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरनुसार (CENC), या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.० इतकी मोजली गेली आहे. जमिनीपासून अवघ्या १० किलोमीटर इतक्या कमी खोलीवर हा भूकंप झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या शक्तिशाली धक्क्यांमुळे झालेले नुकसान किंवा जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, उत्तर तिबेटमधील ‘नागकू’ (Nagqu) या भागात या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. हे ठिकाण तिबेटची राजधानी ल्हासा शहरापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या १० किमी खोलीवर (उथळ पातळीवर) असल्याने धक्क्यांची तीव्रता अधिक जाणवली. स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणा प्रभावित भागातील परिस्थितीचा आढावा घेत असून, नुकसानीचा सविस्तर तपशील मिळणे अद्याप बाकी आहे.
हेही वाचा
‘दिमागी नक्षलवाद्यांनी काँग्रेसवर ताबा मिळवला’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार हल्लाबोल
नेपाळ-चीन सीमेवरील डोंगराळ भागात काही आठवड्यांपूर्वी विनाशकारी पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला होता. त्या नैसर्गिक आपत्तींमध्ये १ हजार ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. या भीषण आपत्तीतून सावरत असतानाच आता तिबेटमध्ये झालेल्या या तीव्र भूकंपाने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
भूकंपप्रवण क्षेत्राचा इतिहास
हा परिसर अत्यंत संवेदनशील आणि भूकंपप्रवण मानला जातो. यापूर्वी २०२५ मध्येही तिबेटमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यामध्ये नेपाळ सीमेलगतच्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) नोंदीनुसार, गेल्या एका शतकात या भागात ६ किंवा त्यापेक्षा अधिक रिश्टर स्केल तीव्रतेचे किमान १० मोठे भूकंप नोंदवले गेले आहेत.




