प्रा. रुपाली राजेश जगनाडे (हुलावळे) यांना भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

पिंपरी | तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिका प्रा. रुपाली राजेश जगनाडे (हुलावळे) यांना छत्तीसगड येथील कलिंगा विद्यापीठ, रायपूर यांच्याकडून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी डॉ. अलोके वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.त्यांच्या संशोधनाचा विषय “अर्धसंवाहकांमध्ये संक्रमण धातूंचे डोपिंग करून नवीन प्रकाशीय व विद्युत गुणधर्मांचे अनुकूलन, संश्लेषण आणि वैशिष्ट्यीकरण” हा होता.
या संशोधनाचा मुख्य उद्देश संक्रमण धातूंच्या डोपिंगद्वारे अर्धसंवाहक पदार्थांच्या प्रकाशीय व विद्युत गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांचे अनुकूलन करणे हा होता. नॅनोपदार्थ, अर्धसंवाहक पदार्थ, प्रकाशीय व विद्युत गुणधर्म, संक्रमण धातूंचे डोपिंग तसेच पदार्थांचे संश्लेषण व वैशिष्ट्यीकरण ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत.
हेही वाचा
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; अमृतसरहून शस्त्रे, हरयाणातून मदत
प्रा. रुपाली जगनाडे (हुलावळे) या अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रातही सक्रिय असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असतात.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय बाळा भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार तसेच अभियांत्रिकी कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग, सहकारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




