Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; अमृतसरहून शस्त्रे, हरयाणातून मदत

मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने (Crime Branch) तपासाचा फास अधिक आवळला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने हरयाणातील सोनीपत येथून समीर, जतिन आणि अंकित खटक या तिघांना अटक केली आहे. या ताज्या कारवाईमुळे या हायप्रोफाइल प्रकरणातील एकूण अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली आहे.

१८ ऑक्टोबर रोजी जुहू येथे टायगर श्रॉफच्या मोटारीवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यात त्याचा चालक जखमी झाला होता. या घटनेनंतर गुन्हे शाखेने तातडीने शोधमोहीम राबवून राजस्थानच्या कोटा येथून तीन प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. फुलसिंग, रेहान अन्सारी आणि रितिक महतो ऊर्फ रोशन अशी त्यांची नावे असून, न्यायालयाने या तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

“मी बांगलादेशला समर्थन दिलं नाही, हा माझ्याविरोधात अपप्रचार”; नेहा बोराचा पलटवार

सोनीपतमधून अटक करण्यात आलेल्या समीरची भूमिका या संपूर्ण कटात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हल्ल्याचा कथित मुख्य सूत्रधार अनिल पंडित आणि संशयित शूटर रेहान अन्सारी यांच्यात संपर्क घडवून आणण्याचे काम समीरने केल्याचा पोलिसांना संशय आहे. याशिवाय हल्लेखोरांना आश्रय देणे, आर्थिक मदत पुरवणे आणि शस्त्र उपलब्ध करून देण्यात समीर, जतिन व अंकित खटक यांचा नेमका काय सहभाग होता, याचा सखोल तपास सुरू आहे.

अमृतसरहून रेल्वेने आणली होती शस्त्रे; मोबाईल नष्ट केल्याचा संशय

यापूर्वी दिल्ली आणि हरयाणा येथून कुणाल, सुमित तसेच राधा आणि बाबिता या दोन महिलांना अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, या टोळीने अमृतसर येथून पिस्तूल आणि काडतुसे मिळवली आणि ती रेल्वेमार्गे मुंबईत आणून हल्लेखोरांपर्यंत पोहोचवली. गुन्ह्यात वापरलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले अद्याप जप्त झालेली नसून, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईल फोन नष्ट केल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस आता डिजिटल पुरावे आणि संदेशवहनाचा तांत्रिक माग काढत आहेत.

आर्थिक व्यवहार आणि २ लाखांची रसद

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कट रचण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी हल्लेखोर व त्यांच्या साथीदारांना सुमारे २ लाख रुपयांची आर्थिक रसद पुरवण्यात आली होती. या पैशांमधूनच गुन्ह्यासाठी दुचाकी खरेदी करण्यात आली होती, तर संशयित शूटर रेहान अन्सारीच्या खात्यावर ३७ हजार रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कटामागील इतर संशयित आणि उर्वरित आर्थिक व्यवहारांची गुन्हे शाखेकडून कसून पडताळणी सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button