महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

PCMC : शिवसेनेच्या सुलभा उबाळेंच्या राजकारणाचा फटका प्राधिकरणवासीयांना का? : गिरीष देशमुख

दुर्गाटेकडीमागील प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून टीका : “मोशीच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांनी आता जबाबदारी घ्यावी”

पिंपरी-चिंचवड : “मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावरून राजकारण करणाऱ्या सुलभा उबाळे आता निगडी–प्राधिकरणातील दुर्गाटेकडीमागे प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाची जबाबदारी घेणार का? त्यांच्या भूमिकांचा फटका निगडी, यमुनानगर आणि प्राधिकरण परिसरातील नागरिकांना का बसावा?” असा सवाल भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव गिरीष कृष्णराव देशमुख यांनी केला आहे.

मोशी येथे होणारा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प दुर्गाटेकडीच्या मागील बाजूस एमआयडीसीच्या जागेत हलविण्याची तयारी सुरू असल्याचा दावा देशमुख यांनी निवेदनातून केला. या प्रक्रियेबाबत नागरिकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत प्रशासनाने संपूर्ण वस्तुस्थिती जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

मोशीच्या प्रश्नावर आरोप; स्वतःच्या परिसरात केंद्राला विरोध

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर सुलभा उबाळे यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले, असे देशमुख यांनी म्हटले आहे. दुर्घटनेची कारणे, सुरक्षिततेतील त्रुटी आणि उपाययोजनांवर भर देण्याऐवजी राजकीय आरोपांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला.

“मोशीतील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस पर्याय सुचवणे आवश्यक होते. मात्र, उबाळे यांनी आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केले. त्यानंतर यमुनानगर परिसरात कचरा प्रक्रिया केंद्र प्रस्तावित होताच त्यालाही विरोध केला. मग शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे?” असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला.

शहरात १२ ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यामध्ये निगडी सेक्टर क्रमांक २२, प्रभाग क्रमांक १३ मधील पाण्याच्या टाकीजवळील जागेचाही समावेश होता, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दररोज एक हजार टन कचऱ्याच्या प्रक्रियेचा दावा

दुर्गाटेकडीमागील प्रस्तावित प्रकल्पात दररोज सुमारे एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याचा दावा देशमुख यांनी केला. त्यामुळे निगडी, यमुनानगर, संपूर्ण प्राधिकरण, रावेत आणि किवळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

“कचरा वाहतूक, संभाव्य दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांबाबत नागरिकांच्या मनात चिंता आहे. प्रकल्प बिनवासाचा असेल, असे सांगितले जात असेल, तर त्यामागील तंत्रज्ञान, प्रदूषण नियंत्रण व्यवस्था आणि सुरक्षिततेची हमी यांची माहितीही सार्वजनिक झाली पाहिजे,” असे देशमुख म्हणाले.

‘राजकारण करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावे’

“मोशी कचरा डेपोवरून राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजणारे आता या निर्णयाची जबाबदारी घेणार का, की बघ्याची भूमिका घेणार? दुसऱ्या परिसरातील प्रकल्पावर टीका करायची आणि स्वतःच्या परिसरात प्रश्न निर्माण झाला की मौन बाळगायचे, हे चालणार नाही,” अशा शब्दांत देशमुख यांनी उबाळे यांच्या भूमिकेवर टीका केली.

“ज्या नागरिकांनी विश्वास ठेवला, त्यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी उबाळे यांची आहे. केवळ विरोध करून प्रश्न सुटत नाही. शहरासाठी व्यवहार्य उपाय आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेची ठोस भूमिका मांडावी लागेल,” असेही त्यांनी नमूद केले.

दुर्गाटेकडी आणि परिसराच्या पर्यावरणासाठी आवाज उठविण्याचे आवाहन

दुर्गाटेकडी आणि प्राधिकरण परिसराचा निसर्ग जपण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन प्रश्न विचारावेत, असे आवाहन देशमुख यांनी केले. प्रस्तावित प्रकल्पाचे नेमके ठिकाण, क्षमता, पर्यावरणीय परिणाम, कचरा वाहतुकीचा मार्ग आणि मंजुरींची स्थिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“मी पक्षाचा पदाधिकारी आहे; त्याआधी या परिसरातील जागरूक रहिवासी आहे. नागरिकांचे आरोग्य, परिसराचे पर्यावरण आणि पुढील पिढ्यांचे भवितव्य यांच्याशी तडजोड होणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा देशमुख यांनी दिला.

“मोशीतील कचरा प्रश्नावरून आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करणाऱ्या सुलभा उबाळे यांनी आता दुर्गाटेकडीमागील प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मोशीत प्रकल्पाला विरोध, यमुनानगरमध्ये प्रक्रिया केंद्राला विरोध; मग शहराच्या कचरा प्रश्नावर त्यांचा ठोस पर्याय काय? त्यांच्या राजकीय भूमिकांची किंमत निगडी–प्राधिकरणवासीयांनी का मोजावी? नागरिकांचे आरोग्य आणि दुर्गाटेकडीच्या पर्यावरणाशी तडजोड आम्ही स्वीकारणार नाही. प्रशासनानेही प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाहीर करून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत.”

— गिरीष कृष्णराव देशमुख
सचिव, भाजपा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button