दिवाळीपूर्वी FDA ची राज्यभर धडक कारवाई! ५४.६६ लाखांचा अन्नसाठा जप्त; ११ हॉटेल्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळखोरांवर कारवाई; राजमा, गूळ, खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्याची तपासणी

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत निकृष्ट दर्जाचे आणि संशयास्पद अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. राज्यभरातील कारवाईत एकूण ३७,९९१.४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत ५४.६६ लाख रुपये आहे. तसेच नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या कारणांवरून ११ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत ५० लाखांचा राजमा जप्त
नवी मुंबईतील नेरूळ येथील ‘मे. आरडीसी ॲग्रो व्हेंचर्स’ या आस्थापनेवर FDA ने कारवाई केली. या ठिकाणाहून निकृष्ट दर्जाचा आणि चुकीचे लेबलिंग असलेला ३३,२८६ किलो राजमा व कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजित किंमत ५० लाख ४ हजार ५८० रुपये आहे. जप्त केलेल्या मालामध्ये ‘रेड राजमा स्मॉल’ आणि ‘बुलेट पल्स’ यांचा समावेश आहे.
नाशिकमध्ये खाद्यतेल, तूप आणि फराळाचे पदार्थ जप्त
सिन्नर आणि नाशिकमधील विविध आस्थापनांवर तपासणीदरम्यान ४८३.४ किलो खाद्यतेल, सोयाबीन ऑइल, तूप तसेच शेव आणि पापडीसारखे फराळाचे पदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची अंदाजित किंमत १ लाख ७० हजार ३७० रुपये आहे. तपासणीत प्रयोगशाळेची सुविधा नसणे आणि आवश्यक तांत्रिक अहवाल उपलब्ध नसणे यांसारख्या त्रुटी आढळून आल्या.
हेही वाचा – इथेनॉल निर्मितीला केंद्राचा मोठा झटका! उसाचा रस आणि बी-हेवी मळीपासून उत्पादनावर बंदी
छत्रपती संभाजीनगरमध्ये गूळ आणि इतर अन्नसाठ्यावर कारवाई
छत्रपती संभाजीनगर विभागातील ‘औरंगाबाद कोल्ड स्टोरेज’मधून ३,७४९ किलो मोकळा गूळ आणि अन्य अन्नपदार्थांसह एकूण ४,२२२ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजित किंमत २ लाख ९१ हजार ३३५ रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अस्वच्छता आणि नियमभंग; ११ आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, गंजलेली भांडी, शिळा पाव ताज्या पावात मिसळणे आणि कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे, अशा बाबी निदर्शनास आल्या. अन्न सुरक्षा कायद्यानुसार संबंधित ११ आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ, खाद्यतेल, तूप आणि इतर अन्नपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर FDA च्या तपासणी मोहिमेमुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे पालन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकिंग, लेबल, उत्पादन व अंतिम वापराची तारीख तपासावी, तसेच संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी.




