एसटी बसस्थानकांवरील अस्वच्छता खपवून घेणार नाही! हलगर्जीपणा केल्यास विभाग नियंत्रकांवर कारवाई
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश; स्वच्छता अधिभाराच्या बदल्यात प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणे बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते. बसस्थानकांवरील स्वच्छतेचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
स्वच्छता अधिभाराच्या बदल्यात दर्जेदार सुविधा द्या!
एसटी महामंडळाकडून प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. या शुल्काच्या बदल्यात प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवणे आणि प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये. प्रवाशांच्या रास्त अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
हेही वाचा – दिवाळीपूर्वी FDA ची राज्यभर धडक कारवाई! ५४.६६ लाखांचा अन्नसाठा जप्त; ११ हॉटेल्सचे परवाने निलंबित
प्रसाधनगृहांची नियमित तपासणी बंधनकारक
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवावे आणि कंत्राटदार संस्थांकडून करारातील अटींनुसार स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.
स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी केवळ कंत्राटदारांवर सोपवून प्रशासनाला चालणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकांवर नियमित स्वच्छता राखली जात आहे की नाही, याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः करणे आवश्यक आहे. प्रवाशांना स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य द्या
एसटी महामंडळ हे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके, स्वच्छ प्रसाधनगृहे आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यास महामंडळाने प्राधान्य द्यावे, असे सरनाईक यांनी सांगितले.
प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे. बसस्थानकांवरील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.




